वाटाणा २०० रुपये किलो, भाजीपाल्याला महागाईचा तडका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:03 PM2022-09-21T14:03:13+5:302022-09-21T14:04:09+5:30
फरसबी, घेवडा, फ्लॉवरही शंभरीपार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे झालेले नुकसान व पितृपक्षामुळे वाढलेल्या मागणीमुळे भाजीपाल्याला महागाईचा तडका बसला आहे. एक जुडी कोथिंबीरसाठी तब्बल १०० रुपये मोजावे लागत आहे. वाटाण्याने दोनशेचा टप्पा ओलांडला असून अनेक ज्यांचे दर प्रतिकिलो १०० च्या पुढे गेले आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गणेशाेत्सवाच्या काळात प्रतिदिन ३ हजार टन भाजीपाल्याची आवक होत होती. परंतु, मागील काही दिवसांपासून राज्यात काेसळत असलेल्या पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून भाजीपाल्याची आवक घटली आहे. बाजार समितीमध्ये मंगळवारी केवळ २,६२६ टन भाजीपाल्याची आवक झाली असून त्यामध्ये ४ लाख ९० हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. कोथिंबिरचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे.
होलसेल मार्केटमध्ये कोथिंबिर जुडीचा दर ३० ते ६० रुपये झाला आहे. मात्र, किरकोळ मार्केटमध्ये एका जुडीसाठी ८० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत.
ताेंडलीनेही गाठला १०० रुपये दर
तोंडलीचाही तुटवडा निर्माण झाला आहे. बाजारपेठेत तुरळक प्रमाणात तोंडली दिसू लागली असून किरकोळ मार्केटमध्ये ८० ते १०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सर्वाधिक भाव वाटाण्याचे वाढले असून किरकोळ मार्केटमध्ये २०० चा टप्पा ओलांडला आहे. पितृपक्ष संपेपर्यंत बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
होलसेल व किरकोळ भाव
भाजीपाला ६ सप्टेंबर १२ सप्टेंबर १२ सप्टेंबर
(होलसेल) (होलसेल) (किरकोळ)
कोथिंबिर १२ ते २६ ३० ते ६० ६० ते १००
वाटाणा ६० ते ८० ८० ते १३० १८० ते २००
ढेमसे ४४ ते ७० ६० ते १०० १०० ते १२०
फरसबी ३५ ते ४६ ५० ते ११० १२० ते १४०
घेवडा ४० ते ६० ५५ ते ७० १०० ते १२०
तोंडली ३० ते ५० ५० ते ८० ८० ते १००
फ्लाॅवर २० ते ३२ २० ते ४० १०० ते १२०