नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे नवी मुंबईत शांतता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 01:58 AM2018-08-10T01:58:57+5:302018-08-10T01:59:08+5:30
पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे गुरुवारी सकल मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदचा नवी मुंबईवर फारसा परिणाम झाला नाही.
नवी मुंबई : पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे गुरुवारी सकल मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदचा नवी मुंबईवर फारसा परिणाम झाला नाही. दोन दिवस अगोदरच सकल मराठा आरक्षण समन्वय समितीने नवी मुंबईचा बंदमध्ये सहभाग नसल्याची घोषणा केली होती. यानंतरही आंदोलनाच्या आडून समाजकंटकांकडून दगडफेक होण्याच्या भीतीमुळे काही व्यावसायिकांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली होती.
सरकारने दिलेल्या आश्वासनावर अविश्वास ठेवत सकल मराठा समाजाने गुरुवारी राज्यात बंदची हाक दिली होती. परंतु २५ जुलैच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नवी मुंबईत आंदोलन होऊ नये अशी पोलिसांची धारणा होती. त्याकरिता पोलिसांनी माथाडी नेते, सकल मराठा समन्वय समिती तसेच स्थानिक यांच्यात बैठका घेतल्या होत्या. यावेळी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नवी मुंबईत बंद होणार नसल्याची घोषणा सकल मराठा आरक्षण समन्वय समिती व माथाडी नेते यांनी संयुक्तपणे केली होती. त्यानंतरही काही व्यक्ती अथवा संघटना यांच्याकडून नवी मुंबई बंदच्या घोषणा केल्या जात होत्या. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली होती. शहरात प्रत्येक महत्त्वाच्या चौकांमध्ये, रेल्वेस्थानके, चित्रपटगृहे तसेच इतर आवश्यक ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. एखाद्या ठिकाणी हिंसा घडल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शीघ्र कृती दल, दंगल निवारण पथक, राज्य राखीव पोलीस बल यांच्याही तुकड्या सक्रिय ठेवण्यात आल्या होत्या. त्यानुसार संपूर्ण शहरात दीड हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तावर कार्यरत होते. त्याशिवाय पोलिसांच्या गस्ती पथकांकडून देखील दिवसभर प्रत्येक विभागाचा आढावा घेतला जात होता. यादरम्यान पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासह सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त हे देखील प्रत्येक ठिकाणी भेटी देत होते.
२५ जुलैच्या आंदोलनावेळी कळंबोली व कोपरखैरणेत दगडफेक होऊन तणाव निर्माण झालेला. यामुळे पुन्हा त्याठिकाणी असा प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती. त्याकरिता कळंबोली येथे मुंबई-पुणे महामार्गाभोवती सुरक्षा कवच तयार केले होते, तर कोपरखैरणेत ठिकठिकाणी लावलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे परिसराला छावणीचे रूप आले होते. सकाळपासून सेक्टर १५ येथील नाक्यावर वेगवेगळ्या कारणांनी मोठ्या संख्येत जमाव जमा होत होता. या जमावाकडून अनपेक्षितपणे वाशी-कोपरखैरणे मार्ग अडवला जाण्याची शक्यता होती. यामुळे पोलिसांकडून जमावाला सतत पांगवले जात होते. मागच्या आंदोलनाला शहरात गालबोट लागल्याने पुन्हा हिंसेच्या भीतीपोटी अनेकांनी घराबाहेर निघण्याचे टाळले. दुपारनंतर मात्र अनेकांनी परिस्थितीचा आढावा घेऊन घराबाहेर निघण्यास सुरुवात केल्यानंतर व्यावसायिकांनीही दुकाने उघडली.
>अफवांचे पीक; पोलिसांची दमछाक
पोलिसांवरील ताण वाढवण्यासाठी अज्ञातांकडून अफवा पसरवल्या जात होत्या. हॉटेलवर दगडकेक झाली, बस फोडली, टायर जाळले असे फोन कॉल पोलीस ठाण्यात खणखणत होते. प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतल्यानंतर ती अफवा असल्याचे समोर येत होते. मात्र, प्रत्येक ठिकाणी धाव घेण्याच्या प्रयत्नात पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
>एपीएमसीचे
पाचही मार्केट बंद
एपीएमसीचे पाचही मार्केट बंदमधून वगळण्यात आले होते, परंतु दोन मार्केटनी बंदमध्ये सहभागी असल्याची दोन दिवसांपूर्वीच घोषणा केली. अशातच उर्वरित तीन मार्केट सुरू राहिल्यास त्याठिकाणी येणाऱ्या शेतमालाच्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. शिवाय मार्केटमधून राज्याच्या विविध भागात जाणारी वाहने तिथपर्यंत पोचतील काही नाही याचीही शंका होती. यामुळे गुरुवारी पाचही मार्केट बंद ठेवण्यात आल्याने त्याठिकाणी शुकशुकाट पसरला होता. दरम्यान, काही तरुणांनी तिथे सुरू असलेली काही दुकाने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.