टेमघर येथे शेकापच्या कार्यकर्त्यांना मारहाण
By admin | Published: February 9, 2017 04:46 AM2017-02-09T04:46:51+5:302017-02-09T04:46:51+5:30
पनवेल तालुक्यातील नेरे टेमघर येथे घरी येत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे
पनवेल : पनवेल तालुक्यातील नेरे टेमघर येथे घरी येत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात सहा जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पनवेल तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रचाराला सुरु वात झाली. उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त झाला आहे. याच दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे विलास फडके व त्यांचे सहकारी तालुक्यातील वाजे गावातील सभा संपवून घरी येत असताना रात्री पावणेबाराच्या सुमारास टेमघर येथील बस स्टॉपवर १२ जणांनी त्यांच्या गाडी (क्र . एमएच ०५ बीएस ०५७१) समोर चार -पाच गाड्या आडव्या टाकल्या. त्यांची गाडी अडवून राजा फडके, विलास फडके, वासुदेव फडके, बाळाराम फडके, महेंद्र भगत, विष्णू फडके (सर्व राहणार विहिघर) यांना लोखंडी रॉड व काठीच्या साहाय्याने हातापायावर मारहाण करण्यात आली आहे. यात इनोव्हा गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. जखमींना म्हात्रे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर या मारहाण प्रकरणी संजय पाटील, राज पाटील, संतोष पाटील, (रा. नेरे) एकनाथ फडके, गुरु नाथ फडके, अक्षय फडके, राजेंद्र फडके, जितेंद्र फडके, हरिशचंद्र फडके, मंगेश फडके, सुनील फडके, रेवन फडके (राहणार विहिघर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यातील राज पाटील हे पंचायत समितीचे नेरे पंचायत समितीच्या गणातील भाजपाचे उमेदवार आहेत. (वार्ताहर)