शेकापची सिडकोवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2016 02:29 AM2016-01-13T02:29:52+5:302016-01-13T02:29:52+5:30
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी खारघरच्या सिडको कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील १८ नागरी समस्या महिनाभरात न सोडविल्यास सिडको
पनवेल : शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी खारघरच्या सिडको कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील १८ नागरी समस्या महिनाभरात न सोडविल्यास सिडको मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेकापच्या कार्यकर्त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.
या मोर्चात माजी आमदार विवेक पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, जिल्हा परिषद सदस्य रामशेठ करावकर, जे. एम. म्हात्रे, सरपंच अंजली ठाकूर, माजी उपसरपंच संजय घरत, ग्रामपंचायत सदस्य अशोक गिरमकर, गुरु नाथ गायकर आदी उपस्थित होते.
खारघरच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. मात्र अपुरा पाणीपुरवठा, कचऱ्याची समस्या, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव, सांस्कृतिक सभागृह, आरोग्याच्या समस्या, शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघरमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका नसणे आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत.
अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी पदपथावर अतिक्र मण केले आहे, कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शेकापने खारघरच्या सिडको कार्यालयावर मोर्चा काढून सिडको अधिकाऱ्यांना निवेदन दिले. परिसरातील समस्यांचे त्वरित निराकरण न केल्यास सिडकोच्या मुख्यालयावर मोर्चा काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शेकापचे कार्यकर्ते भिडले
सिडको कार्यालयात अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर बाळाराम पाटील यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांशी परिसरातील समस्यांवर बोलत असताना, विजय पाटील यांनी गोखले शाळेच्या मैदानाचा विषय काढला. या वेळी अशोक मोरे यांनी तो वेगळा विषय असल्याचे सांगितले असता मोरे आणि पाटील यांच्यात वाद झाला. यावेळी उपस्थित सुरक्षा रक्षक, पोलीस, कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला.
खारघर परिसरात मार्चअखेर तीन विरंगुळा केंद्र उभारून नागरिकांसाठी खुले केले जाईल, कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची सोय, वसाहतीसाठी दोन सांस्कृतिक सभागृह आणि गावनिहाय समाज मंदिर उभारण्यात येणार आहे. तसेच हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मार्चपर्यंत पाणीटंचाई दूर होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित सिडकोचे अधिकारी प्रदीप डहाके, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश गिरी यांनी व्यक्त केला.
आमदारांवर टीका
शेकाप गेल्या दहा दिवसांपासून आंदोलनाचे नियोजन करीत आहे. याची चाहूल लागताच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घाई गडबडीत सिडकोमार्फत उभारल्या जाणाऱ्या २६ मैदाने व उद्यानांचे भूमिपूजन केले. उद्यानांच्या विकासासंदर्भात शेकाप अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत असून आमदार खोटे श्रेय घेत असल्याचा आरोप शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी केला.
... तर कार्यक्र म उधळून लावू
सिडकोमार्फत खारघरमध्ये विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्र मात स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यापुढे असे झाले तर कार्यक्र म उधळून लावू असा इशारा देखील यावेळी सिडको अधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी दिला .