नवी मुंबईतील फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 12:35 AM2021-05-08T00:35:54+5:302021-05-08T00:36:03+5:30
घोषणा केल्याने मदतीची प्रतीक्षा : १५ हजार नोंदणीकृत फेरीवाले
योगेश पिंगळे
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी घोषित करताना राज्य सरकारने फेरीवाल्यांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे घोषित केले होते. सुमारे वीस दिवसांचा कालावधी उलटला असताना नवी मुंबई शहरातील फेरीवाल्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. याबाबत महापालिकेला देखील काही ठोस सूचना मिळालेल्या नसून शहरातील सुमारे १५ हजार नोंदणीकृत फेरीवाले मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरोना झपाट्याने वाढू लागल्याने १३ एप्रिल रोजी निर्बंध अधिक कठोर करण्याची घोषणा करण्यात आली होती. याकाळात फेरीवाले, रिक्षा चालक आदींना दिलासा म्हणून राज्यशासन प्रत्येक नोंदणीकृत फेरीवाल्यांना दीड हजार रुपये मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु घोषणा करून सुमारे २० दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप मदत न मिळाल्याने फेरीवाले नाराजी व्यक्त करत आहेत. शहरात साधारण १५ हजार नोंदणीकृत फेरीवाले असून नोंदणी नसणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या सुमारे १० हजार इतकी आहे.
मागील वर्षी घेण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पथविक्रेत्यांना पुन्हा व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून '' पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी '' योजना राबविण्यात आली होती. या योजनेत पथविक्रेत्याला एक वर्षाच्या परतफेड मदतीसह १० हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवी मुंबई शहरातून सुमारे १५ हजार फेरीवाल्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते. त्यामधील सुमारे चार हजार पथविक्रेत्यांना या योजनेची मदत मिळाली होती. विविध कारणांनी प्रलंबित राहिलेल्या तसेच कालांतराने काही फेरीवाल्यांनी कर्जास नकार दिला. तसेच काहींच्या कर्जाची प्रक्रिया अद्याप सुरुच आहे. आता राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या दीड हजार रुपयांच्या मदतीच्या प्रतीक्षेत फेरीवाले आहे.
नोंदणीकृत फेरीवाल्यांची माहिती महापालिकेकडून शासनाला देण्यात आली आहे. शासनाकडून फेरीवाल्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचा निधी दीनदयाळ अंत्योदय योजना कार्यालयाकडे जमा झाला आहे. निधी त्यांच्याकडून महापालिकेकडे वर्ग केला जाईल तसेच याबाबत गाईडलाईन देखील दिल्या जातील. त्यानंतर फेरीवाल्यांना मदत निधीचे ऑनलाईन पद्धतीने वाटप केले जाणार आहे.
- श्रीराम पवार (उपायुक्त, परवाना विभाग, न.मुं.म.पा)
फेरीवाले काय म्हणतात
शासनाकडून फेरीवाल्यांना मिळणाऱ्या मदतीबाबत महापालिकेच्या विभाग कार्यालयात चौकशी केली होती. परंतु त्यांच्याकडे याबाबत काही माहिती आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
-गोपाल सिंह (फेरीवाला)
-----
संचारबंदीमुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. शासनाने दीड हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली होती परंतु मदत अद्याप मिळालेली नाही. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी.
-महादेव शिंदे (फेरीवाला)
शासनाने जाहीर केलेल्या मदतीमुळे थोडाफार दिलासा मिळाला होता. परंतु अद्याप प्रत्यक्षात मदत मिळालेली नाही. मदत कधी मिळणार याबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.
- संजय देवळे (फेरीवाला)