फेरीवाल्यांनी थाटला नियमबाह्य बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:39 PM2020-06-02T23:39:28+5:302020-06-02T23:39:35+5:30
नागरिकांची गर्दी : सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; नवी मुंबई महापालिकेने निर्बंध आणण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शासनाच्या माध्यमातून लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता करण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा घेत फेरीवाल्यांनी बाजार थाटले आहेत. खरेदीसाठी नागरिक देखील गर्दी करीत असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून यावर महापालिकेने निर्बंध आणण्याची मागणी केली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाउन घेण्यात आला होता. परंतु नागरिकांची होणारी गैरसोय यासाठी लॉकडाऊनमध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. शिथिलता देताना राज्य शासनाच्या माध्यमातून नियमांचे पालन करण्याचे आदेशित देखील करण्यात आले आहे. नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. शहरातील अनेक दुकाने अद्याप बंदच आहेत मात्र या दुकानांसमोर भाज्या, फळे विक्री करणारे फेरीवाले व्यवसाय करीत असून एपीएमसी मार्केच्याच्या बाहेरील मोकळ्या जागेतही अशाच प्रकारचा बाजार भरविला जात आहे. एकमेकांमध्ये कोणतेही अंतर न ठेवता फेरीवाले व्यवसाय करीत असून मास्कचा वापर देखील केला जात नाही. तसेच खरेदीसाठी येणारे नागरिक देखील कोणत्याही नियमांचे पालन करीत नसून गर्दी करीत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासनाने यावर नियंत्रण आणून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.