कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकात मुंबई एन्डकडे नवीन पादचारी पूल उभारण्याचे काम पूर्ण होऊन आता हा पूल प्रवाशांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे. परंतु हा पूल कर्जतकरांसाठी अयोग्य असल्याने कर्जतचे पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना ई-मेल पाठवून कर्जतकरांना त्रास होईल असा पूल का बांधला गेला, अशी विचारणा केली होती. याबाबत चक्क दिल्ली रेल्वे बोर्डाने पंकज ओसवाल यांना ई-मेल पाठविले आहे व तसेच याबाबतीत माहितीच्या अधिकारात सुध्दा विचारणा केली असल्याचे ओसवाल यांनी सांगितले.कर्जत रेल्वे स्थानकात ईएमयूच्या एकदमच जवळ जिना बांधला असल्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता हा जिना हा फलाट क्र मांक दोन व ईएमयूच्या मधोमध न बांधता तो ईएमयूच्या एकदमच जवळ का बांधला? असा प्रश्न पंकज मांगीलाल ओसवाल यांनी माहितीच्या अधिकारात उपस्थित केला होता यावर रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे. जर का या पुलाचा जिना हा ईएमयू व दोन नंबर फलाटाच्या मधोमध बांधला असता तर रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन झाले असते असे खळबजनक उत्तर मध्य रेल्वे प्रशासनाने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाना दिले आहे. खरे पाहिले तर या पुलाच्या जिन्याचे तोंड पुणे एन्डकडे केले असते तर जास्त उपयोगी ठरले असते, कारण मुंबई एन्डकडे जिन्याचे तोंड केल्यामुळे प्रवाशांना वळसा घालून जिन्याचा वापर करणे फार अवघड होउन बसले आहे. सगळ्याच रेल्वे स्थानकात पुलाचे तोंड लोकल गाडीच्या तोंडाकडे असते तर मग कर्जतला पुलाचे तोंड विरुध्द दिशेने का बांधले गेले. सगळे नियम कर्जत रेल्वे स्थानकालाच लागू आहेत का? असा प्रश्न पंकज ओसवाल यांनी उपस्थित के ला आहे.रेल्वेचे नियम प्रवाशांना हानिकारक ठरत असतील तर मग अशा नियमांचा काय उपयोग? प्रवाशांच्या सोईनुसारच नियमांमध्ये बदल करणे आवश्यक असताना रेल्वे तसे न करता कर्जतकरांना वेठीस धरत आहे. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊनच सुविधा पुरविणे गरजेचे असताना कर्जत रेल्वे स्थानकात त्रासदायक ठरेल असा पूल बांधला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुविधा पुरविण्यापूर्वी प्रवाशांना विश्वासात घेऊनच सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. एखादी सुविधा देऊन प्रवाशांना त्याचा फायदा होण्यापेक्षा धोकादायक असेल तर अशा सुविधांचा काहीही उपयोग नाही, असे ओसवाल म्हणाले. (वार्ताहर)
कर्जत स्थानकात ईएमयूजवळ पादचारी पूल!
By admin | Published: December 26, 2016 7:05 AM