लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : भरधाव खासगी बस पलटल्याने त्याखाली चिरडून पादचाऱ्यांच्या मृत्यूची घटना वाशीत घडली आहे. अपघातावेळी बसमध्ये पाच प्रवासी होते, ते देखील जखमी झाले आहेत. चौकात दोन वाहनांची धडक टाळण्यासाठी चालकाने बस वळवली असता ती पलटी होऊन हा अपघात घडला.
वाशी रेल्वेस्थानकासमोरील बस डेपो लगतच्या चौकात शुक्रवारी दुपारी हा अपघात घडला. खासगी बस डेपोकडून सायन पनवेल महामार्गाच्या दिशेने चालली होती. हि बस खासगी कंपनीची असून कामगारांना घेऊन कंपनीकडे चालली होती. सिडको प्रदर्शन केंद्रापासून काही अंतरावरील चौकात बस वळण घेत असतानाच वाशी गावाकडून भरधाव वेगात कचरा वाहतूक करणारी घंटागाडी आली. यामुळे बस व घंटागाडीची संभाव्य टक्कर टाळण्यासाठी बस चालकाने चौकात बस वळवली. मात्र बस वेगात असल्याने तिचा तोल जाऊन रस्त्यालगतच्या पदपथावर कलंडली. यामध्ये त्याठिकाणावरून पायी चालणारी एक व्यक्ती बसच्या खाली चिरडली.
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना सुरक्षित बाहेर काढून क्रेनच्या साहाय्याने बस त्याठिकाणावरून हटवण्यात आली. अपघातावेळी खासगी बस मध्ये पाच प्रवासी होते. बसच्या चालकासह त्यांनाही दुखापत झाली असून सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र पादचारी व्यक्ती बस खाली पूर्णपणे चिरडली गेल्याने ओळख पटलेली नाही. तर रात्री उशिरापर्यंत या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.