लोकमत न्यूज नेटवर्क,
नवी मुंबई : भरधाव टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांना धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे येथे घडली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून चौघी गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ठाणे बेलापूर मार्गावरील पावणे येथील पुलावर सकाळी साडेनऊ च्या सुमारास हा अपघात घडला. पावणे येथील अग्निशमन केंद्रासमोर ठाणे बेलापूर मार्ग ओलांडणाऱ्यांकरिता झेब्रा क्रॉसिंग व सिग्नल बसवण्यात आला आहे. मात्र अनेकदा पामबीच मार्गावरून ठाणेकडे जाणारी वाहने या पुलाच्या उताराला अति वेगात धावत असतात. त्यामुळे तिथले क्रॉसिंग व सिग्नल काही अंतर पुढे घेण्याची गरज यापूर्वीच अनेकदा व्यक्त झालेली आहे. अशातच बुधवारी त्याठिकाणी एका महिलेला अपघातामध्ये प्राण गमवावे लागले आहेत.
काही महिला त्याठिकाणी रस्ता ओलांडत असताना पुलावरून आलेल्या भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिली. यामध्ये निर्मला गुप्ता, विशाला पुजारी, आस्मा पटेल, कोकीळ कदम व इतर जखमी झाल्या होत्या. सर्वजण खैरणे व पावणे एमआयडीसीत कामानिमित्त जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना त्यांच्यासोबत हा अपघात झाला. त्यापैकी सोनाली गोवळकर (२५) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्या नेरूळच्या राहणाऱ्या आहेत. मात्र अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता.
याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार टेम्पो चालक हिरालाल राजेंद्रप्रसाद गुप्ता (४२) याचा शोध घेऊन पोलिसांनी अटक केली आहे. ब्रेक न लागल्याने अपघात घडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. मात्र अपघातामधील जखमींची चौकशी करून, आरटीओकडून वाहनाचे फिटनेस तपासले जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सांगितले. त्याशिवाय घटनास्थळ व मार्गावरील सीसीटीव्ही देखील तपासले जाणार आहेत.