पेण एसटी डेपोचे झाले खंडर

By admin | Published: January 11, 2017 06:23 AM2017-01-11T06:23:36+5:302017-01-11T06:23:36+5:30

यगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या एसटी डेपोपैकी एक असलेल्या पेणमधील रामवाडी डेपोचे खंडरात रूपांतर झाले आहे. येथील इमारत धोकादायक

Pen ST depot has been suspended | पेण एसटी डेपोचे झाले खंडर

पेण एसटी डेपोचे झाले खंडर

Next

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या एसटी डेपोपैकी एक असलेल्या पेणमधील रामवाडी डेपोचे खंडरात रूपांतर झाले आहे. येथील इमारत धोकादायक बनली असून, पिलरमधील लोखंड बाहेर दिसू लागले आहे. स्लॅबमधील लोखंडही दिसत असून, इमारत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा होत असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पेण रामवाडी येथे विभागीय एसटी डेपो आहे. १३ आॅक्टोबर, १९८०मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री बाबासाहेब भोसले व ऊर्जामंत्री जयंतराव टिळक यांच्या हस्ते डेपोचे उद्घाटन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील सर्वात भव्य डेपोंमध्ये याचा समावेश होतो. योग्य देखभाल केली नसल्याने डेपोचे खंडरात रूपांतर होऊ लागले आहे. रंगरंगोटी व दुरुस्तीची कामे वेळेत न केल्याने इमारत धोकादायक होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी पिलरलाच तडे गेले आहेत. पिलर खराब झाल्याने इमारत कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय छताचे प्लास्टर अनेक ठिकाणी पडले आहे. छतामधील लोखंडी सळ्याही दिसू लागल्या असून, ते कधीही कोसळेल अशी स्थिती आहे. डेपोतील डांबरीकरणाचे काम रखडले आहे. सर्वत्र खड्डे पडले असून, सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बस आली की धुळीमुळे डेपोत श्वास घेण्यासही त्रास होत आहे. अशीच स्थिती राहिली तर येथे काम करणारे कर्मचारी, फेरीवाले यांना श्वसनाचे अजार होण्याची शक्यता आहे.
डेपोच्या बाजूला असलेल्या झुणका भाकर केंद्राला टाळे लावले आहे. प्रसाधनगृहांत स्वच्छता ठेवली जात नाही. प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांची दुरवस्था झाली आहे. कॅन्टीनच्या मागील बाजूला गटारातील पाणी बाहेर आले आहे. याच गटारातून पिण्याच्या पाण्याची लाइन जात आहे. पिण्याच्या पाइपमध्ये गटारातील पाणी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साफसफाई केली जात नसल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेपोचा परिसर विस्तीर्ण असून त्याचा योग्य वापर केला जात नाही. मागील बाजूला कचरा साठला आहे. स्वच्छतेनंतर कचरा उचलून नेला जात नसून, कोपऱ्यात जाळण्यात येतो. यामुळे धुराचे लोट परिसरात पसरत आहेत. मागील बाजूला वाढलेले गवतही काढलेले नाही. कोट्यवधी रुपयांच्या या वास्तूची योग्य निगा राखली जात नाही. शासनाने या मालमत्तेच्या रक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.

इमारतीची दुरवस्था
रामवाडी एसटी डेपोच्या इमारतीचे बांधकाम १९८० मध्ये करण्यात आले. तेव्हापासून त्याची योग्य देखभाल दुरूस्ती केली नाही. पावसाळ्यात पूर्ण इमारतीला गळती लागते. परिणामी, पिलर खचले आहेत. प्लास्टरमधील लोखंडी सळई दिसू लागल्या आहेत. भविष्यात इमारत कोसळण्याची शक्यता आहे.

धुळीचे साम्राज्य

डेपोतील भूभागाचे डांबरीकरण रखडले आहे. पावसाळ्यात येथे पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. सद्यस्थितीमध्ये बस आतमध्ये आली की, धुळीचे लोट पसरत आहेत. येथे काम करणारे कर्मचारी, फेरीवाले व प्रवाशांना धुळीचा त्रास होत असून, श्वसनाचे विकार जडण्याची शक्यता आहे.

साफसफाई नाही
डेपोच्या चारही बाजूला मोकळ्या जागेला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. झुणका भाकर केंद्रही बंद आहे. प्रसाधनगृहाची स्वच्छता होत नाही. कचरा डेपाच्या आवारातच जाळला जात आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Web Title: Pen ST depot has been suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.