शौचालय नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
By Admin | Published: September 8, 2016 03:10 AM2016-09-08T03:10:44+5:302016-09-08T03:10:44+5:30
रायगड जिल्हा स्वच्छतेच्याबाबतीत अग्रेसर राहावा यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रशासनातर्फे विविध क्लृप्त्या लढविल्या जात आहेत.
आविष्कार देसाई , अलिबाग
रायगड जिल्हा स्वच्छतेच्याबाबतीत अग्रेसर राहावा यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रशासनातर्फे विविध क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. मात्र रायगडच्या ग्रामीण भागातील काही नागरिकांना त्याचे काहीच देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. स्वच्छता अभियानासाठी कंबर कसणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेने आता शौचालय न बांधणाऱ्यांवर मुंबई पोलीस अधिनियमानुसार दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यासाठी त्यांनी बुधवारी एक आवाहन पत्र प्रसिध्द करुन तसा इशाराच स्वच्छता अभियानाला खीळ घालणाऱ्यांना दिला आहे.
गेल्याच महिन्यामध्ये ‘गाठीभेटी स्वच्छतेसाठी’ या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. वार्षिक कृती आराखड्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील ३५ हजार कुटुंबापर्यंत पोचून त्यांना शौचालय बांधण्यास प्रवृत्त करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या अभियानासाठी जंगजंग पछाडत आहेत. परंतु त्यांना अपेक्षित प्रतिसाद प्राप्त होत नसल्याचे दिसून येते. गाठीभेटी घेऊन, जनजागृती करुन, पोस्टरबाजी करुन, जाहिराती, मोठमोठे होर्डिंग्ज लावूनही ग्रामीण भागातील काही नागरिकांची मानसिकता पाहिजे त्या प्रमाणात अद्यापही बदलताना दिसून येत नाही. त्यामुळे अशा नागरिकांना कायद्याचा धाक दाखविणे गरजेचे असते.
याचसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने शौचालय नसणाऱ्यांना विनम्र आवाहन करणारे पत्र काढले आहे. एक पाऊल स्वच्छतेकडे टाकून स्वच्छ भारत अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी घर तेथे शौचालय बांधावे आणि सार्वजनिक आरोग्यमान उंचवावे, असे आवाहन त्या पत्रात केले आहे. त्याचप्रमाणे शौचालय नसल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व ११७ नुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पत्रातून देण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून शौचालयाची उभारणी न करता उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची नावे सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्द करण्यात येतील. विविध सरकारी योजनांपासून त्यांना वंचित ठेवण्याचा सज्जड दमचा देण्यात आला आहे.
प्रशासनाच्या या कारवाईच्या बडग्याचा धसका घेऊन किती शौचालयाची उभारणी होणार आहे हे लवकरच समोर येईल, तसेच प्रशासन खरेच कारवाईचा बडगा उगारुन नागरिकांना स्वच्छतेची सवय लागणार का असाही प्रश्न पडला आहे. पाणी व स्वच्छता विभागाने तयार केलेल्या आवाहन पत्राचे प्रकाशन रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांच्याहस्ते बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अविनाश सोळंके, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. पी.डी. पाटोदकर आदी उपस्थित होते.