लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मास्कच्या नावाखाली महापालिकेच्या संबंधित विभागाकडून फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याची तक्रार वाशी विभागातील काही फेरीवाल्यांनी केली आहे. विशेष म्हणजे मास्क लावलेला असताना हेतुपरस्पर फेरीवाल्यांकडून पाचशे रुपयांच्या पावत्या फाडल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कामगार नेते तथा शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रदीप वाघमारे यांनी केली आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सतर्क राहण्याच्या सूचना नागरिकांना केल्या आहेत. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. महापालिकेचे अधिकारी ठिकठिकाणी फेरी मारून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयातर्फेसुध्दा कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी मास्क घातलेला असतानासुध्दा दंडाची पावती फाडली जात असल्याच्या तक्रारी आहेत. वाशी अतिक्रमण विभागातील काही अधिकारी त्यासाठी फेरीवाल्यांना वेठीस धरत आहेत. फेरीवाला परवाना तपासणीच्या नावाखाली सुरक्षा रक्षकाच्या साहाय्याने फेरीवाल्यांकडून मास्क लावला नाही अशी सबब सांगून जबरी पाचशे रुपयांची पावत फाडत आहेत. वाशी सेक्टर १५ येथील कपडा मार्केटमधील अनेक फेरीवाल्यांना अशाप्रकारचा अनुभव आल्याचे प्रदीप वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे पावती नाही फाडली तर हे अधिकारी त्रास देतील म्हणून हे फेरीवाले निमूटपणे पावती फाडत आहेत.
nया प्रकाराचे आपण स्वत: साक्षीदार असून, महापालिकेने संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात लवकरच आपण महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी कळविले.