नवी मुंबई : घणसोली रेल्वेस्थानक व डीमार्ट परिसरात रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीवर कारवाईच्या उद्देशाने आरटीओने सोमवारी विशेष मोहीम राबवली. त्यामध्ये रिक्षाचालकांसह नियम तोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली. यावेळी एक अल्पवयीन बुलेटचालक आरटीओ पथकाच्या हाती लागला. नियम पायदळी तुडवून तो पथकासमोरून बुलेट घेऊन चालला होता. त्याला १४ हजार रुपयांचा दंड आकारल्याने त्याच्या पालकांना बुलेट चालवायला देणे चांगलेच महागात पडले.
घणसोली परिसरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली आहे. बेजबाबदारपणे रिक्षा पळवल्या जात असून त्यातून छोट्यामोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. या रिक्षाचालकांमध्ये बहुतांश तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून चालकपरवाना किंवा बॅज नसतानाही काही जण भाड्याच्या रिक्षा चालवत आहेत. त्यातच स्टेशन परिसरात केवळ दोनशे मीटरच्या अंतरावर रस्त्यावरच तीन स्टॅन्ड तयार झाले आहेत. यामुळे निम्म्याहून अधिक रस्ता रिक्षांनी व्यापला जात आहे. अशा वेळी इतर वाहनांसाठी अडथळा होत असून त्यातून वादाचे प्रकार घडत आहेत. या रिक्षाचालकांना बाजूला होण्यास किंवा शिस्तीने चालण्याचा सल्ला दिल्यास त्यांच्याकडून गुंडगिरीची भाषा वापरली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.
रिक्षाचालकांकडे बॅज, गणवेश नाहीया रिक्षाचालकांकडे गणवेश अथवा बॅज कधीच दिसत नाही. तर काही रिक्षा या भंगार अवस्थेतल्या दिसत असून त्यांचे नंबरदेखील अस्पष्ट झालेले आहेत. त्यामुळे एखादा अपघात किंवा गुन्हा करून या रिक्षाचालकांनी पळ काढल्यास शोधण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शिस्तीत व नियमाने व्यवसाय करणाऱ्यांनाच रस्त्यावर रिक्षा चालवू देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी आरटीओ अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या निर्देशानुसार त्यांच्या पथकाने घणसोली स्थानकाबाहेर व डीमार्ट बाहेर कारवाई केली. त्यामध्ये बहुतांश रिक्षाचालकांकडे कागदपत्रे आढळली नाहीत.