सुटे पैसे नसल्याने नागरिक अडचणीत
By Admin | Published: November 10, 2016 03:50 AM2016-11-10T03:50:45+5:302016-11-10T03:50:45+5:30
शासनाने ५०० व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे मध्यरात्रीपासून शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी मुंबई : शासनाने ५०० व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे मध्यरात्रीपासून शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी प्रचंड रांगा लागल्या होत्या. दिवसभर हॉटेल, टोल नाका, पेट्रोल पंप व सर्वत्र या नोटा स्वीकारण्यास संबंधितांनी मनाई केल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. अनेक ठिकाणी सुटे पैसे देण्यावरून भांडण झाले होते. सुटे पैसे नसल्याने औषधही मिळत नसल्याने रुग्णांचेही हाल झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा, नकली नोटा व भ्रष्टाचार थांबविण्यासाठी ५०० व हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा करताच शहरवासीयांनी तत्काळ एटीएमबाहेर रांगा लावल्या. जवळ असलेल्या नोटा रात्रीच बँकेत भरण्यास सुरवात झाली. अनेक ठिकाणी पैसे भरण्यासाठी अर्धा ते एक तास रांग लावावी लागत होती. पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा मात्र भ्रमनिरास झाला. एटीएममधून १०० च्या नोटाच येत नसल्याने निराश होवून परत जावे लागले. शहरातील ९५ टक्के एटीएम सेंटर दिवसभर बंद ठेवली होती. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांपासून ते नोकरी व्यवसायावर निघालेल्या चाकरमान्यांपर्यंत फक्त रद्द केलेल्या नोटांचीच चर्चा होती. रेल्वे स्टेशनमध्ये तिकीट काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांकडूनही रद्द केलेल्या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या. तिकीट खिडकीबाहेर स्पष्ट नोटिसा लावण्यात आल्या होत्या. सुटे पैसे नसल्याने अनेकांनी विनातिकीट प्रवास केला. महापालिकेच्या विभाग कार्यालयामध्ये पाणी व मालमत्ता कर भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांकडूनही या नोटा स्वीकारण्यात आल्या नाहीत. यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर भरणा न करताच परत जावे लागले.
शहरातील पेट्रोलपंप व टोलनाक्यांवर वाहनधारक व संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होवू लागली होती. सुटे पैसे नसणाऱ्यांना पेट्रोल दिले जात नव्हते. टोलनाक्यावरही रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्यात येत नव्हत्या. यामुळे सुरू झालेल्या भांडणामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुटे पैसे नसल्याने आम्ही कुठून देवू अशी व्यथा वाहनधारक बोलून दाखवत होते, तर पेट्रोल पंप व टोलनाक्यावरील कर्मचारी आमच्याकडेही सुटे पैसे नसल्याचे कारण देत असल्याने सर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. भाजी मार्केट, किराणा स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स, रुग्णालये सर्वच ठिकाणी सुट्या पैशांवरून वाद सुरू होते. शासनाच्या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येणार असल्याने त्याचे स्वागत केले आहे, पण त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीतून बाहेर कसे पडायचे, असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. या निर्णयामुळे होणारी गैरसोय थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.
पनवेलमध्ये रिक्षाचालकांना फटका
पनवेल : मंगळवारपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने पनवेलमध्ये सामान्य माणसाचे व्यापारी, पेट्रोल पंप चालक व रिक्षा चालक यांच्याबरोबर अनेक ठिकाणी वाद होताना दिसत होते. आज धंद्यावर परिणाम होऊन पन्नास टक्केही धंदा झाला नसल्याचे रिक्षा चालक व व्यापाऱ्यांनी सांगितले.
आज पेट्रोल पंपावर ५०० व १००० रुपयांच्या नोटा चालतील असे सांगितल्याने गाडीत पेट्रोल भरण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. काहींनी आपल्या गाडीतील किंवा दुचाकीतील पेट्रोल घरात काढून ठेवून पेट्रोल पंप गाठला होता. मात्र तेथील कर्मचाऱ्यांकडे ही सुटे पैसे नसल्याने ५०० किंवा १००० ची नोट दिल्यावर तेवढ्याचे पेट्रोल टाकायला सांगितले जात असल्याने ग्राहक व कर्मचारी यांच्या वाद होत होता.
पनवेलमधील डी मार्टमध्ये नेहमी खरेदीसाठी गर्दी असते. मात्र व्यवस्थापनाने ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारणार नाही अशी सूचना दर्शनी भागावर लावल्याने तेथेही गर्दी नव्हती. सरकारला मदत करणे आमचे कर्तव्य असल्याने आम्ही असे केल्याचे तेथील ट्रेनी व्यवस्थापकाने सांगितले. आम्ही रोज पैशांचा भरणा मशीनद्वारे रात्रीच करत असल्याने आमच्याकडे ग्राहकांना द्यायला सुटे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले. फक्त डेबिट व क्रेडिट कार्डवर खरेदी करता येत असल्याने ग्राहकांनी पाठ फिरवली होती. रोजच्यापेक्षा ग्राहक कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेचे तिकीटही मिळाले नाही : रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीवरही रद्द केलेल्या नोटा घेणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांकडेही पैसे नसल्याने अखेर विनातिकीट प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नव्हता. भांडण करत बसण्यापेक्षा तिकीट काढायलाच नको, अशी प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत होते.