नवी मुंबई- दुबईत वेगवेगळ्या पदांवर नोकरीला लावतो सांगून अनेकांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने सीबीडी येथे कार्यालय थाटून सोशल मीडियाद्वारे दुबईत नोकरीची जाहिरात करून हा प्रकार केला आहे.
सीबीडी येथील फॅसिलिटी अँड ओव्हरसिस सर्व्हिसेस कार्यालयात हा प्रकार घडला आहे. साजीद खान याने सदर नावाने हे कार्यालय सुरु केले होते. आपल्या कंपनी मार्फत दुबईत नोकरी लावली जाईल अशी जाहिरात त्याने सोशल मीडियावर केली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून राज्याच्या विविध भागातील इच्छुक तरुणांनी त्याला संपर्क साधला होता. त्यानुसार सोलापूरच्या रामसिंग इंगोले, पुंडलिक शिंदे, सुनील शिंदे, विनोद चव्हाण, रोहित पाटील, रमेश भोसले व इतर अशा एकूण १४ जणांनी ५० हजार ते १ लाख रुपये त्याला नोकरीसाठी दिले होते. त्यापैकी काहींना त्याने दुबईत नोकरी लागल्याचे सांगून दुबईत पाठवले होते.
मात्र त्याठिकाणी त्यांच्या व्हिजा मध्ये पुरुष ऐवजी स्त्री अशी चूक घडवून आणून त्यांना परत भारतात पाठवले होते. यामुळे फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात येताच खान याने कार्यालय बंद करून पळ काढला आहे. या प्रकरणात अद्याप ९ लाखाची फसवणूक समोर आली असून इतरही अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याप्रकरणी सोमवारी रात्री सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच सीबीडी मधील एका तरुणाला दुबईत नोकरीला पाठवून त्याला ठरलेल्या कामाऐवजी वेगळ्या ठिकाणी नोकरीला लावून त्याचे शोषण झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर फसवणुकीचा हा देखील प्रकार समोर आला आहे.