कोकणातील माणूस उद्योजक व्हावा !
By Admin | Published: February 5, 2016 02:54 AM2016-02-05T02:54:29+5:302016-02-05T02:54:29+5:30
आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक शिक्षित युवकांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. बी.कॉम., एम.कॉम अशा उच्चशिक्षित लोकांनाही स्पर्धा परीक्षेत यश मिळेलच असे नाही.
नांदगाव : आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक शिक्षित युवकांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. बी.कॉम., एम.कॉम अशा उच्चशिक्षित लोकांनाही स्पर्धा परीक्षेत यश मिळेलच असे नाही. यासाठीच बेरोजगार तरुण स्वत:चा उद्योग प्रस्थापित करुन स्वत:च्या पायावर उभा राहावा, अशी इच्छा आहे. मंगेश दांडेकर मित्र मंडळ व सुवर्ण कोकण फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ७ फेबु्रवारी रोजी उद्योजक कार्यशाळा आयोजित केली असून कोकणातील माणूस उद्योजक बनवा, अशी आपली धारणा असल्याचे प्रतिपादन मित्र मंडळाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी केले.
मंगेश दांडेकर मित्र मंडळ व सुवर्ण कोकण फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ७ फेबु्रवारी दरबार हॉल पटांगणावर ‘उद्योजक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती देताना ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक नितीन पवार, पंचायत समिती सदस्य अनंता ठाकूर, मजगाव उपसरपंच योगेन्द्र गोयजी, इम्तीयाज मलबारी, आदेश भोईर, मुग्धा दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दांडेकर म्हणाले की, या उद्योजक मेळाव्यास सुवर्ण कोकण फाऊंडेशन मुंबईचे संस्थापक सतीश परब हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत कृषी पर्यटन, पशुपालन व दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन, शेळी पालन, मत्स्यव्यवस्था, नारळ सुपारी आदी व्यवसायांवर बहुमूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. हा कार्यक्रम फक्त ऐकण्यासाठी नसून अमलात आणण्यासाठी आहे. भविष्याची वाटचाल यशस्वी करण्यासाठी ही कार्यशाळा तरुणांना उपयोगी ठरेल असा विश्वास दांडेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक नितीन पवार म्हणाले, उद्योजक कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांकडून कोणतीही प्रवेश फी घेण्यात येणार नाही. कार्यशाळेत सहभागासाठी कोणत्याही शिक्षणाची अट ठेवण्यात आलेली नाही. कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. (वार्ताहर)