नवी मुंबई : तुर्भे स्मशानभूमीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. शेडमधील स्मशानभूमीला धुरांडेही नसल्यामुळे सर्व धूर वसाहतीमध्ये जाऊन नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्रस्त झालेल्या रहिवाशांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले असून प्रश्न तत्काळ मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नवी मुंबईमधील मध्यवर्ती स्मशानभूमीमध्ये तुर्भेचाही समावेश आहे. या ठिकाणी सर्वाधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. परंतु मुख्य स्मशानभूमीची दुरुस्ती सुरू असल्यामुळे ती बंद करण्यात आली असून, बाजूलाच पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्मशानभूमी तयार केली आहे.वास्तविक, तुर्भे परिसरासाठी ही तात्पुरती सोय उपलब्ध केली आहे. परंतु, सद्य:स्थितीमध्ये मध्यवर्ती स्मशानभूमीप्रमाणेच त्याचा वापर होत असून, दिवसभर अंत्यसंस्कार सुरूच असतात. अनेकवेळा अंत्यसंस्कारासाठी तासन्तास वाट पाहावी लागतआहे.स्मशानभूमीला धुरांडे नसल्यामुळे सर्व धूर तुर्भे सेक्टर २१, एपीएमसीचे फळ मार्केट व परिसरात जात आहे. वसाहतीमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. मृतदेह जळत असतानाचा वासही घरांमध्ये येत आहे. यामुळे स्थायी समितीच्या माजी सभापती शुभांगी पाटील यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास ही समस्या आणून दिली आहे.सदर ठिकाणी पीएनजी शवदाहिनी व धूर जाण्यासाठी धुरांडे तत्काळ बसविण्यात यावे. सर्व मृतदेह याच ठिकाणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.पाटील यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी आयुक्तांना याविषयी निवेदनही दिले असून, तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे.मध्यवर्ती स्मशानभूमीची दुरुस्ती सुरू असल्यामुळे जवळच तात्पुरती स्मशानभूमी तयार केली आहे. तेथे धुरांडे नसल्यामुळे व क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह इतर विभागांतूनही तेथे पाठविले जात असल्यामुळे परिसरातील रहिवाशांना धुराचा त्रास होत आहे. ही समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली आहे.- शुभांगी पाटील,माजी स्थायी समिती सभापती