दिव्यांगांना ‘काळजी केंद्रा’तून मिळणार मायेची ऊब
By योगेश पिंगळे | Published: February 20, 2024 08:47 PM2024-02-20T20:47:16+5:302024-02-20T20:47:25+5:30
दिव्यांगांसह पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबई : दिव्यांग मुलांच्या पालकांना; तसेच पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या इतर दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मदत व्हावी, यादृष्टीने महापालिका कार्यक्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर दिव्यांग काळजी केंद्र सुरू करणे प्रस्तावित करण्यात आले असून शीघ्र हस्तक्षेप केंद्र देखील प्रस्तावित आहे. यामुळे दिव्यांगांसह पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जन्माला येणारी जवळपास १० टक्के मुले कोणत्या ना कोणत्या दिव्यांगत्वामुळे ग्रस्त असतात. या मुलांच्या दिव्यांगत्वाचे लवकरात लवकर निदान झाल्यास; तसेच त्यांच्यावर तत्परतेने योग्य उपचार सुरू केल्यास दिव्यांगत्व कमी करण्याची त्यांना एक संधी प्राप्त होईल. यामुळे दिव्यांग मुलांची कार्यक्षमता वाढण्यास अबवा असलेल्या कार्यक्षमतेचा जास्तीत जास्त वापर करता येण्यास मदत होईल. तांत्रिक कारणांमुळे अशी केंद्रे सुरू करण्यामध्ये अडचण निर्माण झालेली होती, ती अडचण दूर करून महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर शीघ्र हस्तक्षेप केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
१२७ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार स्टॉल
दिव्यांग सन्मान योजनेअंतर्गत ३३० पात्र लाभार्थ्यांना दिव्यांग स्टॉल वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे त्यापैकी २०३ दिव्यांग लाभार्थ्यांना स्टॉलचा ताबा देण्यात आलेला आहे व उर्वरित १२७ दिव्यांग लाभार्थ्यांना स्टॉलचा ताबा देण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे.