महामार्गाच्या समस्यांवर लोकप्रतिनिधींचे मौन

By admin | Published: June 30, 2017 03:07 AM2017-06-30T03:07:42+5:302017-06-30T03:07:42+5:30

शासनाने, ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ तत्त्वावर १२२० कोटी रुपये खर्च करून, उभारलेल्या सायन-पनवेल महामार्गाला समस्यांचा विळखा पडला आहे.

People's Representatives Silence on Highway Issues | महामार्गाच्या समस्यांवर लोकप्रतिनिधींचे मौन

महामार्गाच्या समस्यांवर लोकप्रतिनिधींचे मौन

Next

नामदेव मोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शासनाने, ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ तत्त्वावर १२२० कोटी रुपये खर्च करून, उभारलेल्या सायन-पनवेल महामार्गाला समस्यांचा विळखा पडला आहे. ठेकेदाराने काम अर्धवट ठेवले आहे. पादचारी पूल, भुयारी मार्गाचे काम रखडले आहे. पथदिवे बंद असून, पूर्ण रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रोज १० लाख प्रवाशांना अडथळ्यांचा प्रवास पार करावा लागत असून, या प्रश्नावर आजी-माजी पालकमंत्री दोन, खासदार, पनवेल, नवी मुंबईमधील विधानपरिषद व विधानसभेचे एकूण पाच आमदार व नगरसेवकांनी मौन बाळगले आहे. एकाही राजकीय पक्षांनी या प्रश्नावर आंदोलन करण्याचा साधा इशाराही दिला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
सायन-पनवेल महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर बहुतांश सर्वच राजकीय पक्षांनी छोट्या-मोठ्या कारणांवरून आंदोलने करून, शासन व ठेकेदारांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. खारघर टोलनाक्याच्या मुद्द्यावरूनही सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. नवी मुंबईमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जनहित याचिका दाखल करून आम्हालाच प्रवाशांची काळजी असल्याचा भास निर्माण केला होता; परंतु टोल सुरू झाल्यानंतर ठेकेदाराने शिल्लक राहिलेली कामे पूर्ण केली नाहीत. पहिल्याच पावसात पूर्ण महामार्ग खड्ड्यात गेल्यानंतरही कोणीच आंदोलने केली नव्हती. यावर्षी पहिल्याच पावसात महामार्गाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. उरणफाट्यावरील उड्डाणपुलावर एका महिन्यात ५०पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. वाहतूकदार व प्रवासी त्रस्त आहेत; पण या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी एकदाही सायन-पनवेल महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला नाही. रोडवरील अर्धवट अवस्थेमध्ये असलेल्या कामांची पाहणीही केलेली नाही. ठाण्याचे खासदार राजन विचारे नवी मुंबईत आले की, रेल्वेस्टेशन व पालिका मुख्यालय यापेक्षा दुसरीकडे जातच नाहीत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे दर्शनच दुर्मीळ झाले आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक व बेलापूरच्या मंदा म्हात्रे या नागरी समस्यांसाठी नेहमीच पाठपुरावा करतात; परंतु सायन-पनवेल महामार्गाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी टोल बंद करण्यासाठी राजीनामा दिला; पण कामे मार्गी लावण्यासाठी अवाक्षरही काढलेले नाही. विधानपरिषद सदस्य नरेंद्र पाटील व बाळाराम पाटील यांच्यासह नवी मुंबई व पनवेलमधील नगरसेवक व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनीही महामार्गाचे काम पूर्ण व्हावे व देखभाल दुरुस्तीची कामे वेळेवर करावी, या मागणीसाठी आंदोलन केले नाही व सरकारी अधिकारी व मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केलेला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: People's Representatives Silence on Highway Issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.