लोकप्रतिनिधींनाही हवाय आरोग्य विमा; महासभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:19 AM2019-06-21T01:19:23+5:302019-06-21T01:19:31+5:30
विजय चौगुले यांची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या लोकप्रतिनिधींना आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य विमा देण्यात यावा, अशी मागणी गुरु वारी २0 जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली. महापालिकेचे दिवंगत नगरसेवक निवृत्ती जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते. या मागणीला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला असून श्रद्धांजलीचा प्रस्ताव संपल्यानंतर महासभा तहकूब करण्यात आली.
या वेळी महासभेत जगताप यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी मांडला होता. यावर चर्चा करताना लोकप्रतिनिधींनी जगताप यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी विरोधी पक्षनेते चौगुले यांनी नगरसेवक काम करताना मानसिक तणावाखाली असतात. आरोग्याची वेळोवेळी तपासणी करणे अनेक नगरसेवकांना आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नसून यासाठी महापालिकेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कुटुंबाचा आरोग्य विमा देण्यात यावा व त्याअनुषंगाने पुढील महासभेत हा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी आणावा अशी मागणी केली. याआधीच महापालिकेने अशी सुविधा उपलब्ध करून दिली असती तर जगताप यांच्या बाबतीत असे घडले नसते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दिवंगत नगरसेवक जगताप यांना सभागृहात श्रद्धांजली वाहायची असल्याने त्यांच्या पत्नी नगरसेविका नीलम जगताप यांना आजच्या महासभेत बोलावण्यात आले नसल्याचे महापौर सुतार यांनी सांगितले. जगताप यांच्या प्रयत्नातून प्रभागात सुरू असलेली तसेच राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक सहकार्य करण्याचे आदेश प्रशासनाला देत महासभा तहकूब केली.
प्रशासनाशी चर्चा करणार
लोकप्रतिनिधींना अशा प्रकारचे आरोग्य विमा संरक्षण पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने दिले असल्याचे त्यांनी सांगत नवी मुंबई महापालिकेने देखील लोकप्रतिनिधींचा आरोग्य विमा काढण्याची मागणी त्यांनी केली. श्रद्धांजली वाहताना नगरसेवक रामचंद्र घरत, अविनाश लाड, नामदेव भगत, सूरज पाटील, संजू वाडे, घनश्याम मढवी, द्वारकानाथ भोईर, सुधाकर सोनावणे आदी नगरसेवकांनी देखील विमा संरक्षण देण्याची मागणी केली. यावर आयुक्त रामास्वामी एन. यांनी या विषयावर बोलताना लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करीत प्रशासनाशी चर्चा करून याबाबत चाचपणी केली जाणार असल्याचे सांगितले.