नवी मुंबई - राज्याच्या नगरविकास विभागाने मागील तीन वर्षात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारने सुद्धा प्रशंसा केली आहे. त्यामुळेच येत्या काळात नगररचना विभागाचे जबाबदारी अधिक व्यापक झाली आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी येथे केले.
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या 105 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध योजना व नवनियुक्त अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, नगर रचना विभागाचे मुख्य संचालक नोरेश्वर शेंडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
विकास आराखडा तयार करताना यापूर्वी तांत्रिक अडचणी येत असत. परंतु आता परिस्थिती सुधारली आहे. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे आपणाला अपेक्षित विकास साधणे शक्य झाले आहे. स्मार्ट शहरे म्हणजे उंच इमारती नव्हेत. त्यासाठी तेथील सोयीसुविधांचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नियोजनाअभावी शहरे बकाल झाली आहेत. त्यामुळे आता "री अर्बनायझेशन " करण्याचे गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगर विकास विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर रणजीत पाटील तसेच नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांचेही भाषण झाले.