नवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये युतीच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला होता. चर्चेमध्ये जागावाटपावर एकमत न झाल्याने अखेर भाजपानेही निवडणूक स्वबळावर लढण्याची व जिंकण्याची घोषणा केली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये युती होणार का याविषयी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कोणी किती व कोणत्या जागा लढवायच्या यावर चर्चा सुरू होती. पनवेल नगरपालिकेवर भाजपाची सत्ता असल्याने व पनवेल मतदार संघामध्ये आमदारही भाजपाचाच असल्याने भाजपाने ६० जागा लढण्याचा व शिवसेनेला २० जागा देण्याचा फॉर्म्युला ठेवला होता. शिवसेनेने जास्त जागा मागितल्या होत्या. युतीची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. पक्षाचे सचिव व अभिनेते आदेश बांदेकर यांनी प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन जोरदार प्रचार सुरू केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही स्वबळावर लढण्याच्या सूचना दिल्या असल्याने त्यादृष्टीने प्रचार सुरू करण्यात आला होता. शनिवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असल्याने व निवडणुकीला अत्यंत कमी दिवस राहिल्याने अखेर भाजपानेही स्वबळावर लढण्याचे स्पष्ट केले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की आम्ही युतीसाठी पुरेपूर प्रयत्न केले; पण आम्ही देऊ केलेल्या जागांपेक्षा जास्त जागांची मागणी सेनेने केली होती. परस्पर स्वबळावर लढण्याची घोषणाही केली होती. यामुळे भाजपानेही सर्वच्या सर्व जागा लढण्याची व जिंकण्याची तयारी केली आहे. आमचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार निवडीचे काम सुरू आहे. बहुतांश प्रभागांमध्ये उमेदवार निश्चित झाले आहेत. काही ठिकाणी इच्छुकांमधून चर्चा करून योग्य व सक्षम उमेदवार देण्यासाठीची चर्चा सुरू आहे लवकरच आमचे सर्व उमेदवार घोषित होतील. महापालिका व्हावी यासाठी भाजपाने आग्रह धरला होता. यामुळे आता पहिलीच निवडणूक जिंकणे याला आमचे प्राधान्य असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
पनवेलमध्ये युतीच्या चर्चेला पूर्णविराम
By admin | Published: April 29, 2017 1:53 AM