पनवेलमधील पासपोर्ट कार्यालय लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 05:53 AM2018-05-14T05:53:33+5:302018-05-14T05:53:33+5:30

टपाल कार्यालयात जागेचा अभाव आणि केंद्रीय स्तरावरील किचकट प्रक्रिया आदीमुळे पनवेलमधील पासपोर्ट कार्यालय लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे

Permanent Passport Office in Panvel | पनवेलमधील पासपोर्ट कार्यालय लांबणीवर

पनवेलमधील पासपोर्ट कार्यालय लांबणीवर

Next

पनवेल : टपाल कार्यालयात जागेचा अभाव आणि केंद्रीय स्तरावरील किचकट प्रक्रिया आदीमुळे पनवेलमधील पासपोर्ट कार्यालय लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पनवेलकरांना आणखी काही महिने त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पनवेलसह रायगड जिल्ह्यात एकही पासपोर्ट कार्यालय नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्टसंदर्भातील कामासाठी थेट ठाणे येथे जावे लागते. यावर उपाय म्हणून मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेलमध्ये स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय व्हावे, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पनवेल शहरात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यास परराष्ट्र मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांना पासपोर्ट काढायचा असेल, तर आॅनलाइन प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर ठाणे कार्यालय गाठावे लागते. विशेष म्हणजे याकरिता देण्यात येणाऱ्या ठरावीक वेळेत पासपोर्ट कार्यालय ठाणे याठिकाणी पोहचणे गरजेचे असते. मात्र या कार्यालयात पोहचताना अनेक वेळा वाहतूककोंडीचे विघ्न अनेकांसमोर येत असल्याने त्या कालावधीत पासपोर्ट कार्यालयात पोहचणे काहींना अवघड होते. अशावेळी तो संपूर्ण दिवस वाया जातो.ही समस्या ओळखून रायगड जिल्ह्याचा महत्त्वाचा भाग असलेला व जिल्ह्यातून सहजरीत्या पोहचता येणारे ठिकाण म्हणून पनवेल शहर ओळखले जाते. त्यामुळे पनवेल शहरात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली होती. परंतु केंद्रीय स्तरावरील किचकट प्रक्रि येमुळे सध्या हे पासपोर्ट केंद्र लांबणीवर गेले आहे.
तीन महिन्यांपूर्वी खुद्द बारणे यांनी पनवेलमध्ये पुढील सहा महिन्यांत हे पासपोर्ट कार्यालय सुरू होईल, असे सांगितले होते. पासपोर्ट कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला होता. याकरिता नवीन पनवेल येथील पोस्ट आॅफिसमध्ये जागा निश्चित करण्यात आली होती. तसे पत्र पासपोर्टच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयानेही पनवेलच्या पोस्ट कार्यालयाला पाठविले होते. परंतु तीन महिने उलटले तरी यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते. एकूणच सध्याची परिस्थिती पाहता हे कार्यालय सुरू होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पासपोर्ट आवेदनात खारघर जिल्ह्यात अव्वल
पनवेल तालुक्यातील खारघर हे झपाट्याने विकसित होत आहे. येथील लोकसंख्या जवळपास चार लाखांच्या घरात आहे. विशेष म्हणजे संपूर्ण रायगड जिल्ह्यात पासपोर्ट आवेदनाच्या बाबतीत खारघर शहर अव्वल आहे. २0१७ मध्ये जवळपास आठ हजार नागरिकांनी पासपोर्टसाठी अर्ज केले होते. सध्या दिवसातून वीस ते पंचवीस अर्ज प्राप्त होत असल्याचे खारघर पोलिसांनी सांगितले.

Web Title: Permanent Passport Office in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.