पनवेल: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वाढणारी कोरोनाबाधिताची संख्या लक्षात घेता राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्याचे नागरिकांनी काटेकोर पालन करण्याच्या उद्देशाने गुरूवारी पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांची संयुक्त ऑनलाईन बैठक झाली. ही बैठक पालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि पोलीस परिमंडळ- २ चे उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. (Permanent seal of shops in case of violation of rules)कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून कारवाईचे उल्लंघन केल्यास पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत आस्थापना सील होणार आहेत. पोलीस विभाग आणि पालिकेचे कर्मचारी संयुक्तिकरित्या कारवाई करणार आहेत. पालिका क्षेत्रातील सात पोलीस ठाणेक्षेत्रात पोलिसांसोबत पालिकेची सात भरारी पथके तयार करण्यात येणार असून ती आपल्या विभागामध्ये नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाया करणार आहेत. तसेच बाजार समित्या, मुख्य बाजारपेठा याठिकाणची गर्दी टाळण्यासाठी संयुक्तिक कारवाई करण्यावरही चर्चा करण्यात आली. हॉटेल, रेस्टॉटंट, बार, आस्थापना याठिकाणी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गर्दी असेल तर अशांवर गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच कोरानाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत या आस्थापना सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खारघर येथील शत्रुघ्न माळी, तळोजा येथील काशीनाथ चव्हाण, कळंबोली येथील संजय पाटील, कामोठे येथील स्मिता जाधव, खांदेश्वर येथील देवीदास सोनावणे, पनवेल शहर येथील अजयकुमार लांडगे, पनवेल तालुका येथील रवींद्र दौंडकर तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर उपस्थित होते.रुग्ण फिरताना आढळल्यास क्वारंटाइन सेंटरमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक, फौजदारी अशा दोन्ही कारवाया करण्यात येणार आहेत. सील केलेल्या कंटेन्टमेंट झोनमधील पॉझिटिव्ह तसेच लक्षणे असलेले रुग्ण बाहेर फिरताना दिसल्यास त्यांना इंडिया बुल्स क्वारंटाइन सेंटरमध्ये जबरदस्तीने हालविण्यात येईल.
नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने कायमस्वरूपी सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 8:05 AM