पनवेल : महानगरपालिका क्षेत्रात १४ ते २४ जुलैदरम्यान नव्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, या काळात नागरिकांची विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेता, पालिकेने शुक्रवारी या लॉकडाऊनमध्ये शुद्धिपत्रक काढत शिथिलता आणली आहे. नव्या शुद्धिपत्रकानुसार शुक्रवारपासूनच सर्व नियमांची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.पनवेलमधील कडक लॉकडाऊनच्या अनुषंगाने मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. कोविडबाबत पालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या उपायांबाबत आयुक्तांना प्रश्न विचारण्याचे आवाहन ‘आयुक्तांना फोन लावा’ आंदोलनाद्वारे मनसेने केले होते. त्याची दखल घेऊन पालिकेने हा निर्णय घेतला असल्याचा दावा मनसेचे रायगड जिल्हा विद्यार्थी सेनेचे अक्षय काशीद यांनी केला. शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनीही लॉकडाऊनच्या विरोधात आवाज उठविला होता. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर यांनीही आवाज उठवला होता.- नव्या नियमांनुसार अन्नधान्य, भाजीपाला, बेकरी, किराणा, तसेच इतर जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीला सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी आहे. दूध डेअरीही सकाळी ५ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी पालिकेने दिली आहे.
दूध, भाजीपाला वितरणाला परवानगीु, पनवेल पालिकेने शुद्धिपत्रक काढून केले स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:08 AM