जप्त केलेली तूरडाळ विकण्यास परवानगी
By Admin | Published: November 24, 2015 01:57 AM2015-11-24T01:57:00+5:302015-11-24T01:57:00+5:30
काही दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यात पुरवठा विभागाने टाकलेल्या धाडीत साडेनऊ हजार मेट्रिक टन तूरडाळ आढळली होती
पनवेल : काही दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यात पुरवठा विभागाने टाकलेल्या धाडीत साडेनऊ हजार मेट्रिक टन तूरडाळ आढळली होती. त्यामधील एकूण साडेसहा हजार मेट्रिक टन डाळ सवलतीच्या दरात विक्रीकरिता बाहेर काढण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे कमीत कमी ९५ आणि जास्तीतजास्त शंभर रुपये दराने ग्राहकांना तूरडाळ उपलब्ध होणार आहे.
राज्यात निर्माण झालेले दुष्काळजन्य परिस्थितीमुळे कडधान्याचे पीक आले नाही. विशेष करून तूर, मूग व मटकीच्या पिकावर पावसाचा परिणाम झाला. त्यामुळे साहजिकच डाळींचे उत्पन्न सुध्दा कमी झाले. परिणामी किमतीत वाढ झाली आहे. रोजच्या आहारात वरणाचा समावेश असल्याने त्याकरिता चढ्या भावाने डाळ खरेदी करावी लागत आहे. त्यातल्या त्यात तूरडाळ प्रति किलो पावणे दोनशे रुपयांवर गेली आहे. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहेच त्याचबरोबर अवेळी पडलेल्या पावसामुळे कडधान्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तूर, मूग, मटकी त्याचबरोबर उडदाच्या डाळीच्या किमती वाढलेल्या आहेच. या व्यतिरिक्त व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्यामुळे भाव गगनाला पोहचले असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून वरण गायब झाले.
या अनुषंगाने देशभरात पुरवठा विभागाने काही दिवसांपूर्वी धाडसत्र सुरू केले होते. पनवेल तालुक्यातही खरेदी अधिकारी युवराज बांगर, पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे, पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली अजिवली, डेरवली आणि कळंबोली या ठिकाणी वेअर हाऊस व गोदामावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. अकाश, इडलवाईज अक्षय, केअर टेकर्स, ईडीडी या वेअर हाऊसेसचा समावेश होता. संबंधित व्यापारी व वेअर हाऊस मालकांनी क्षमतेपेक्षा जास्त कडधान्य, डाळी एकत्रित ठेवल्याचे आढळून आले. हा माल त्याच गोदामात ठेवण्यात आला होता. शासनाकडून ही डाळ ग्राहकांना सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला. जप्त केलेली डाळ शंभर रुपये किलो दराने देण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यातील गोदाम मालकांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी बाँड लिहून घेतले आहेत.
त्यानंतर त्या गोदामातील डाळ रिलिज करण्याची परवानगी संबंधितांना देण्यात आली आहे. (वार्ताहर)