कंपनीच्या बँक खात्यातून रक्कम लुटणाऱ्याला अटक; सिम स्वॅप सुविधेचा गैरफायदा
By सूर्यकांत वाघमारे | Published: December 4, 2023 09:04 PM2023-12-04T21:04:06+5:302023-12-04T21:04:13+5:30
फार्म कंपनीच्या बँक खात्यातून १८ लह ७४ हजार लुटणाऱ्या एकाला सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई: फार्म कंपनीच्या बँक खात्यातून १८ लह ७४ हजार लुटणाऱ्या एकाला सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम बंगालमधून त्याला अटक करण्यात आली असून त्याने सिम स्वॅप करून गुन्हा केल्याचे उघड झाले. एअरटेल कंपनीशी संबंधित असलेल्या एका फार्मा कंपनीसोबत हि ऑनलाईन फसवणूक झाली होती. याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एरटेल कंपनीने या फार्मा कंपनीला व्यवहारासाठी कॉर्पोरेट लॉगिन दिले होते.
अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीररीत्या हे लॉगिन करून फार्मा कंपनीच्या खात्यातून १८ लाख ७४ हजार रुपये चोरले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहायक आयुक्त विशाल नेहूल, वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांनी उपनिरीक्षक रोहित बंडगर, रविराज कांबळे, भाऊसाहेब फटांगरे, सचिन पावशे, पूनम गडगे यांचे पथक केले होते. त्यानुसार पूनम गडगे यांनी तांत्रिक तपास करून संबंधित खाते हे पश्चिम बंगालमध्ये वापरले असून त्या खातेधारकाची माहिती मिळवली. त्यानुसार सायबर पोलिसांच्या पथकाने पश्चिम बंगालमध्ये धडक देऊन नूर इस्लाम सॅनफुई (२१) याला अटक केली आहे. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत सिम स्वॅप करून गुन्हा केल्याचे सांगितले. फार्मा कंपनीच्या खातेधारकाचा मोबाईल क्रमांक त्याने सिम स्वॅप करून स्वतकडे मिळवला होता. सदर सिम स्वॅप झाल्याचा मॅसेज खातेधारकाला आला असतानाही त्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे त्यांचे सिमकार्ड बंद होऊन नूर याच्याकडे असलेल्या सिमवर तो नंबर सुरु झाला होता. त्याद्वारे त्याने बँक खात्याचे अधिकार मिळवून ऑनलाईन रक्कम हडपली होती. त्याने इतरही अनेकांना अशा पद्धतीने गंडा घातल्याची शक्यता असून पोलिस अधिक तपास करत आहेत.