नवी मुंबई : चालत्या दुचाकीवरून पडल्याने पाठीमागून येणाऱ्या कारखाली चिरडून व्यक्तीच्या अपघाती मृत्यूची घटना रविवारी रात्री वाशी खाडीपुलावर घडली. सदर घटनेनंतर कारचालकाने कारसह घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर भरधाव वेगात कार चालवून अपघाताला कारणीभूत ठरल्यामुळे दुचाकीचालकाला वाशी पोलिसांनी अटक केली आहे.कादर उर्फ दाजू कुजदुनकर (४३) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते चिता कॅम्प, ट्राँबे येथे राहणारे आहेत. रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास वाशी खाडीपुलावर त्यांचा अपघाती मृत्यू झाला. ट्राँबे येथे राहणाऱ्या शागुल अहमद याच्यासोबत अॅक्टिवा दुचाकीवरून ते वाशीच्या दिशेने येत होते. या वेळी शागुल दुचाकी चालवत होता, तर कादर हे पाठीमागे बसले होते. ते खाडीपुलावर आले असता, तोल सुटल्याने त्यांच्या दुचाकीचा अपघात घडला. या अपघातामध्ये दोघेही रस्त्यावर पडले असताना पाठीमागून आलेली भरधाव कार कादर उर्फ कुजदुनकर यांच्या अंगावरून गेली. त्यामुळे कारखाली चिरडून कादर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पाहून भयभीत झालेल्या शागुल याने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर त्या कारचालकानेही कारसह घटनास्थळावरून पळ काढला. अखेर एका कारचालकाने पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये फोन करून खाडीपुलावर एक मृतदेह पडलेला असल्याची माहिती दिली. तर रस्त्यावर छिन्न-विछिन्न अवस्थेत पडलेल्या या मृतदेहामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर वाशी पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो पालिका रुग्णालयात पाठवला. त्यानंतर सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली; परंतु रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती.
कारखाली चिरडून व्यक्तीचा मृत्यू
By admin | Published: May 02, 2017 3:25 AM