अधिकाऱ्याच्या नियुक्तीविरोधात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 01:20 AM2020-12-16T01:20:48+5:302020-12-16T01:20:56+5:30
भरती प्रक्रियेवेळी पात्र ठरलेल्या तीन उमेदवारांना डावलून चौथ्या क्रमांकाच्या व्यक्तीला सेवेत दाखल करून घेतल्याचा त्यांचा आरोप आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या अग्निशमन विभागात भरती झालेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात अग्निशमन कर्मचाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भरती प्रक्रियेवेळी पात्र ठरलेल्या तीन उमेदवारांना डावलून चौथ्या क्रमांकाच्या व्यक्तीला सेवेत दाखल करून घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल न घेतली गेल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
महापालिकेच्या अग्निशमन विभागात विभागीय अग्निशमन अधिकारी पदासाठी गतवर्षी भरती झाली होती. खुल्या आरक्षण गटातून ही भरती झाली होती. यावेळी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांपैकी चौथ्या क्रमांकाच्या पुरुषोत्तम जाधव यांना नियुक्त करण्यात आले. त्यापूर्वी जाधव हे एमआयडीसीच्या अग्निशमन दलात कार्यरत होते. त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या बढतीच्या आधारे पालिकेत त्याच बरोबरीच्या पदावर घेण्यात आले. मात्र, त्यांना खालच्या पदावरील कामाचा अनुभव नसल्याने कर्मचाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे अग्निशमन कर्मचारी युनियनचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनाच आपत्कालीन प्रसंगातील कामाचा अनुभव नसल्यास एखाद्या दुर्घटनेच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतू शकते, अशीही भीती कर्मचाऱ्यांना आहे, शिवाय जाधव यांनी पदभार स्वीकारताच कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर जोर दिल्याचाही कामगारांचा आरोप आहे. यामुळे त्यांच्या भरतीच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी वर्षभर सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु त्यांच्या तक्रारीची दखल न घेतली गेल्याने कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी जाधव यांच्या भरतीच्या विरोधात याचिका केली असून, न्यायालयाने जनहितार्थ ती दाखल करून घेतली आहे. यामुळे प्रशासनाकडून वशिल्याने भरती केल्या जात असल्याची शंका उपस्थित होत आहे. मात्र, याबाबत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चर्चा करण्यास नकार दिला.