पेट्रोलने भरलेल्या टँकरने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 05:26 AM2017-08-07T05:26:31+5:302017-08-07T05:26:31+5:30
पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे रविवारी पहाटे वाशी येथून २० हजार लीटर पेट्रोलने भरलेला टँकर औरंगाबादकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उलटला. त्यानंतर टँकरमधील पेट्रोल नाल्यात मिसळून त्यातून
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे रविवारी पहाटे वाशी येथून २० हजार लीटर पेट्रोलने भरलेला टँकर औरंगाबादकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उलटला. त्यानंतर टँकरमधील पेट्रोल नाल्यात मिसळून त्यातून आगीचा भडका उडाला. यात टँकर पूर्णपणे जळून खाक झाला असून टँकरचालकासह इतर पाच पादचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
वाशी येथून २० हजार लीटर पेट्रोल असलेला टँकर (एमएच ०४ डीडी १९७२) घेऊन चालक पहाटेच्या वेळी औरंगाबादकडे जात होता. याच दरम्यान चालकाचा टँकरवरील ताबा सुटून तो मुंबई-पुणे महामार्गावरील भोकरपाडा येथील नाल्याजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटला. टँकरमधील पेट्रोल बाजूच्या नाल्यातील पाण्यात मिसळून त्यातून आगीचा भडका उडाला.
आगीत टँकर पूर्णपणे जळून खाक झाला असून चालक जखमी झाला. चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. तर टँकरमधील पेट्रोलचा भडका उडाल्याने पादचारी जेनीफ अली (१९), अलगीर (३१), अब्दुल अलीम (२०), सद्दाम हुसेन (२२) व खालिफ शेख (२५) (सर्व राहणार भोकरपाडा) हे किरकोळ भाजले असून त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगीची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस, पनवेल महापालिका अग्निशमन दल, सिडको अग्निशमन दल, मोहोपाडा व रसायनी-पाताळगंगा येथील अग्निशमन दल, रिलायन्स कंपनीच्या फोमच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या प्रकारामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.