उरण : कामावरून कमी केलेल्या १४३ कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने संतप्त झालेल्या एपीएम टर्मिनलच्या (मर्क्स) कामगारांनी अधिकारी आणि कामगारांना घेऊन येणाऱ्या दोन बसेसवर दगडफेक करून आपला संताप व्यक्त केला.कामगारांच्या दगडफेकीत पोलीस नाईक शंकर चरोस्करसह मर्क्स कंपनीचे तीन कामगार जखमी झाले आहेत. कामगारांच्या दगडफेकीत पोलीस हवालदारच गंभीररीत्या जखमी झाल्याने या प्रकरणी उरण पोलिसांनी चित्रफितीवरून २५-३० संशयित कामगारांची धरपकड सुरू केली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.येथील एपीएम (मर्क्स) कंपनीचे काम कमी झाल्याचे कारण देत फेब्रुवारी २०१८ मध्ये उरण-पनवेल युनिटमधील १४३ कामगारांना कमी केले आहे. कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात कमी केलेल्या १४३ कामगारांचा एपीएल टर्मिनल व्यवस्थापनाबरोबर जोरदार संघर्ष सुरू आहे. मागील सहा महिन्यांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने व्यवस्थापन आणि कामगार, कामगार संघटना, पुढारी यांच्यात मॅरेथॉन बैठकाही झाल्या आहेत. मात्र कामगारांना आश्वासनाशिवाय काही मिळाले नाही. यामुळे बेरोजगार झालेल्या १४३ कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली.व्यवस्थापनाने कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कामगारांच्या असंतोषाचा तिसºयांदा भडका उडाला. कमी केलेल्या कामगारांनी सोमवारी सकाळी कामावर अधिकारी आणि कामगारांना घेऊन येणाºया दोन बसेसवर जोरदार दगडफेक करून आपला राग व्यक्त केला. याआधीही दोन वेळा बसेस, गाड्या फोडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे एपीएम टर्मिनलच्या अधिकारी आणि कामगारांना घेऊन येणाºया गाड्यांना पोलीस बंदोबस्त दिला आहे. पोलीस बंदोबस्तात आलेल्या गाड्यांवरच कामगारांनी दगडफेक केली आहे. यामध्ये एकूण चार जण जखमी झाल्याची माहिती उरण पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.
एपीएम टर्मिनलच्या बसवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 2:24 AM