फुले-आंबेडकर साहित्य मुख्य प्रवाहात येणे गरजेचे
By Admin | Published: April 10, 2017 06:12 AM2017-04-10T06:12:17+5:302017-04-10T06:12:17+5:30
फुले-आंबेडकरी साहित्य चळवळ ही मुख्य साहित्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, त्याची फार मोठी जबाबदारी
नवी मुंबई : फुले-आंबेडकरी साहित्य चळवळ ही मुख्य साहित्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, त्याची फार मोठी जबाबदारी नवे साहित्यकारांवर आहे, असे मत प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी वाशी येथील बुद्ध प्रतिष्ठान सभागृहात आयोजित फुले-आंबेडकर साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.
फुले-आंबेडकर साहित्यकारांनी साहित्य चळवळ अधिक लोकाभिमुख करत बौद्धिक विचारवंत यांना एकत्र करणे गरजेच असल्याचे विचारही डॉ. डोंगरगावकर यांनी व्यक्त केले.
वाशी शिवाजी चौक येथून साहित्य दिंडीने या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. १९६१ सालापासून देशातील नवं बुद्ध यांना घटनेच्या कोणत्याच कायद्यात समाविष्ट केले गेले नसल्याची खंत या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. राजकारण्यांकडून मोठी फसवणूक झाली असून त्यामुळे नोकरी, शिक्षण आणि विविध शासकीय योजना यापासून वंचित राहावे लागत असल्याची नाराजी डोंगरगावकर यांनी व्यक्त केली.
भगवा दहशतवाद देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खरा धोका आपणास देशांतर्गत वाढत चाललेल्या धर्मांध शक्तीपासून असल्याचे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. संमेलनातील आंबेडकरी वाद साहित्य आणि समाज या विषयावरील परिसंवादात बोलताना परिवर्तन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. दत्ता हेगडे यांनी लोकशाहीला सुसंगत आंबेडकरी वाद असल्याचे सांगितले, तर प्रा. शुक्राचारी गायकवाड यांनी साहित्यकार, विचारवंत या समाजातील प्रबोधन करणाऱ्या घटकांनी फुले-आंबेडकर विचारधारा सांगत असताना जुन्या रूढी, अनिष्ट प्रथा यावर आसूड उभारले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. प्रसिद्ध कवियत्री विद्या शिर्के-बाळदकर यांनी सदर संमेलनाचे सूत्रसंचालन काव्यात्मय शैलीत करून रसिकांची दाद मिळवली. दुसऱ्या सत्रात प्रा. रेखा मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली फुले आंबेडकरी साहित्यात महिलांचे योगदान या विषयावर शारदा नवले, उषा आंबोरे, शीला जाधव आणि शोभा कांबळे यांनी आपले विचार मांडले. या वेळी शाहीर कुंदन कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. सायंकाळी बहारदार कवी संमेलन झाले.