नवी मुंबई : दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाचा टेंभा मिरविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या ४३ शाळांत मुख्याध्यापकच नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्याशिवाय शिक्षकांची अपुरी संख्या, वर्गखोल्यांची कमी व इतर साधनसामग्रीचा प्रकर्षाने अभाव असल्याचे महापालिकेने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
समाजसेवक सुधीर दाणी यांनी महापालिकेच्या शाळांची स्थिती, वर्ग खोल्या, विद्यार्थी व शिक्षकांची संख्या तसेच सध्या कार्यरत असलेले मुख्याध्यापक आदींची आरटीआयअंतर्गत माहिती मागितली होती. संबंधित विभागाने दाणी यांना दिलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या शैक्षणिक वर्षात शिक्षकांचा पगार, इमारत निर्मित्ती, देखभाल खर्च व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत शैक्षणिक साहित्यांपोटी २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ५५ करोड ८२ लाख ४४ हजार १३३ रुपये खर्च केले आहेत.
महापालिकेच्या एकूण अर्थसंकल्पापैकी हे प्रमाण केवळ १.२ टक्के इतके असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या एकूण ७४ शाळा आहेत. यापैकी राज्य शिक्षण मंडळाच्या ७३ तर सीबीएसई बोर्डाची एक शाळा आहे. ४२ मराठी माध्यमाच्या ४२, तर इंग्रजी माध्यमाच्या २० आहेत. हिंदी माध्यमाच्या ९ तर उर्दू माध्यमाच्या २ शाळा आहेत. मराठी माध्यमासाठी एकूण ४६० शिक्षक व शिक्षिका आहेत. यात तर इंग्रजी माध्यमासाठी २०८, हिंदी माध्यमासाठी १५६, तर उर्दू माध्यमासाठी १५ शिक्षक आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार ७४ शाळांपैकी तब्बल ४३ शाळांत मुख्याध्यापकाची नियुक्तीच केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मराठी माध्यमाच्या २५, इंग्रजी माध्यमाच्या १३, हिंदी माध्यमाच्या ५ शाळेत मुख्याध्यापक नाहीत. उर्दू माध्यमाच्या दोनपैकी एका शाळेत मुख्याध्यापक नाही. एकूणच महापालिकेच्या एकूण शाळांपैकी ३२ शाळांत मुख्याध्यापक कार्यरत आहेत. तर ४३ शाळांत मुख्याध्यापकांची अद्याप नियुक्तीच केली नसल्याचे उघड झाले आहे.
चार हजार कोटी रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्प असणारी महापालिका शैक्षणिक उपक्रमांवर केवळ १.२ टक्के इतकाच खर्च करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम म्हणून महापालिकेच्या शाळांत अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे. अनेक शाळांमध्ये स्टाफ रूम व मुख्याध्यापक रूम नाहीत. तर काही शाळांत विज्ञान प्रयोगशाळा नसल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय शिक्षक वर्गही अपुरा आहे. महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक असणे अभिप्रेत आहे. किमान जितके वर्ग तितके शिक्षक असणे गरजेचे आहे. परंतु शिक्षक कमी असल्याने अनेक शाळेत दोन वर्ग एकत्रित भरविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दाणी यांनी म्हटले आहे.
दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षण विभागात ठोस उपाययोजनांची गरज आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांबरोबरच जितक्या इयत्ता किमान तेवढ्या वर्ग खोल्या, प्रत्येक वर्गाला स्वतंत्र एक शिक्षक, प्रत्येक शाळेला मुख्याध्यापकाची नियुक्ती, गणित, विज्ञान व इंग्रजी या महत्त्वाच्या विषयांसाठी तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती तसेच एकूण अर्थसंकल्पाच्या ६ टक्के निधी केवळ शिक्षणावर खर्च करणे अपेक्षित आहे. - सुधीर लक्ष्मीकांत दाणी, आरटीआय कार्यकर्ता