भूखंड घोटाळ्याप्रकरणी जनहित याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 02:37 AM2019-05-07T02:37:53+5:302019-05-07T02:38:15+5:30
खारघर शहरातील सेंट्रल पार्कमधील रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील जागा कोयना प्रकल्पग्रस्तांना देऊन, अवघ्या काही दिवसांत ती जागा खासगी विकासकाला नाममात्र दरात विक्र ी केल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजले होते.
पनवेल - खारघर शहरातील सेंट्रल पार्कमधील रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील जागा कोयना प्रकल्पग्रस्तांना देऊन, अवघ्या काही दिवसांत ती जागा खासगी विकासकाला नाममात्र दरात विक्र ी केल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजले होते. थेट मुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी आरोप केल्यानंतर या प्रकरणी चौकशी समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले असून खारघरमधील रहिवासी संदीप खाकसे यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात २ मे रोजी जनहित याचिका दाखल केली आहे.
सिडकोच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली असून यामध्ये जिल्हाधिकारी रायगड, पॅराडाईज ग्रुपचे मालक मनीष भतीजा, संजय भालेराव यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
खारघर शहरातील सेक्टर २३, २४, २५ मध्ये नियोजित २०० एकर जागेवर सिडकोने सेंट्रल पार्क उभारण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ३५ हेक्टरवर सेंट्रल पार्क विकसित करण्यात आले. उर्वरित ५५ हेक्टरवर दुसरा टप्पा नियोजित असताना याठिकाणच्या सर्वे नंबर १८३ मधील जागा कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आली. सुमारे २४.५ एकर जागा ९ शेतकऱ्यांनी एकाच बिल्डरला सुमारे १५ लाख प्रति एकर दराने देऊ केली. जमिनीचा भाव सुमारे कोट्यवधीच्या घरात असताना सिडकोने या व्यवहारात कोणताच हस्तक्षेप केला नाही.