कळंबोली : पनवेल महापालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याप्रमाणे सर्वच ठिकाणच्या कुंड्या बाजूला काढण्यात आल्या आहेत. दररोज वसाहतीत दोन वेळा गाडी सुरू करण्यात आली आहे; परंतु तीन दिवसांपासून कळंबोली वसाहतीत घंटागाडी न आल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर कचरा साचला आहे. घनकचरा नियोजनाचा बोजवारा उडाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पनवेल महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन ही सेवा सिडकोकडून वर्षांपूर्वी हस्तांतरित करून घेतली आहे, याकरिता महापालिकेने साईगणेश ही एजन्सी नियुक्त केली आहे. महापालिकेकडून याकरिता वाहनेही पुरवण्यात आली आहेत. त्यानुसार सिडको वसाहतीतील कचरा उचलण्याकरिता दररोज दोन वेळा घंटागाडी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर पडणाºया कचºयावर थोडेफार नियंत्रण मिळविले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.
महापालिका क्षेत्रात कचराकुंडीमुक्त तर झाली; परंतु कचरा उचलण्याचे गणित मात्र बिघडू लागले आहे. महापालिकेकडून ओला कचरा व सुका कचरा यांचे वर्गीकरण करून कचरा उचलला जात नाही. दोन्ही प्रकारचा कचरा एकाच गाडीत वाहून नेले जाते. याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
कळंबोली वसाहतीत तीन दिवसांपासून घंटागाडी फिरकलीच नाही, त्यामुळे सोसायटीच्या बाजूचा कोपरा, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. तसेच मोकळ्या जागेतही रहिवाशांकडून कचरा टाकला जात आहे. यामुळे वसाहतीत दुर्गंधी सुटली आहे. कचºयाच्या ढिगाºयावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रस्त्याच्या कडेला टाकलेल्या कचºयामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. कचरा लवकरात लवकर उचलावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. या बाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांच्याकडे संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
महापालिका क्षेत्रातील कचरा संकलन करण्याकरिता ठेकेदाराला वाहने महापालिकेकडून पुरवण्यात आली आहेत. त्याबाबतचे मेंटनेन्स वेळच्या वेळी करणे बंधनकारक आहे; परंतु तीन दिवसांपासून कळंबोलीतील कचरा वाहतूक करणाºया गाडीचे मेंटनेन्स निघाले असल्याने घंटागाडी कळंबोली वसाहतीत आली नसल्याचे समजते.यासाठी महापालिकेकडून दुसरी व्यवस्था करणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नसल्याने कचºयाचे ढिगारे कळंबोलीत वसाहतीत साचले गेले.