तुर्भे उड्डाणपुलाखाली खड्ड्यांचे साम्राज्य
By admin | Published: August 29, 2015 10:22 PM2015-08-29T22:22:24+5:302015-08-29T22:22:24+5:30
ठाणे - बेलापूर रोड व सायन - पनवेल महामार्ग यांच्यामध्ये असलेल्या तुर्भे उड्डाणपुलाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीस
नवी मुंबई : ठाणे - बेलापूर रोड व सायन - पनवेल महामार्ग यांच्यामध्ये असलेल्या तुर्भे उड्डाणपुलाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही येथील खड्डे बुजविले जात नाहीत.
नवी मुंबईमध्ये सर्वाधिक वाहतूक असलेल्या रस्त्यांमध्ये सायन - पनवेल महामार्ग व ठाणे - बेलापूर रोडचा समावेश होतो. महापालिकेने काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्याचे नाव ठाणे - बेलापूर असले तरी प्रत्यक्षात तो तुर्भे नाक्यापर्यंतच आहे. तेथून पुढे सायन - पनवेल महामार्ग सुरू होतो. या दोन्ही रस्त्यांच्या मध्ये उड्डाणपूल ते शरयू हुंडाईपर्यंतच्या रस्त्याकडे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. पावसामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वाहतूक पोलीस चौकीच्या परिसरातच मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. ३०० ते ४०० मीटर अंतरावरील रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली आहे.
या परिसरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. लवकरात लवकर खड्डे बुजविले नाहीत तर सह्यांची मोहीम राबवून वेळ पडली तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)