नवी मुंबई : महापालिका प्रशासन व काही लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कोपरखैरणे विभागाला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. बैठ्या चाळींच्या जागेवर चार ते पाच मजली बांधकाम करण्यात आले असून त्यामुळे नागरी सुविधांचाही बोजवारा उडाला आहे. वाहतूककोंडी व पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. मैदानांचाही वाहनतळाप्रमाणे वापर सुरू आहे. माता-बाल रुग्णालय बंद असल्यामुळेहीनागरिकांची गैरसोय होत आहे.नवी मुंबईच्या सिडको विकसित नोडमधील सर्वात जास्त अनधिकृत बांधकामे कोपरखैरणे परिसरामध्ये झाली आहेत. येथील बैठ्या चाळींच्या जागेवर पूर्वी महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेऊन वाढीव एक मजल्याचे बांधकाम केले जात होते; परंतु विकासकांनी महापालिका प्रशासन व काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून रहिवाशांना वाढीव बांधकाम करण्याचे आमिष दाखविण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला दोन मजले व नंतर पाच मजल्यांपर्यंतचे बांधकाम करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या परिसराला झोपडपट्टीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बांधकामांची उंची वाढली. येथे वास्तव्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढू लागली; परंतु रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, जलवाहिनीच्या व इतर सुविधा पूर्वी एवढ्याच आहेत. वाढीव बांधकामांमुळे सार्वजनिक सुविधांवर ताण येऊ लागला आहे. कोपरखैरणेमधील सर्वच अंतर्गत रस्त्यांवर रात्री वाहतूककोंडी होऊ लागली आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. महापालिकेने नागरिकांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या मैदानांमध्ये वाहने उभी केली जात आहेत. रोडवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळेही वाहतूककोंडीमध्ये भर पडू लागली आहे. सिडको विकसित नोडची झोपडपट्टीप्रमाणे स्थिती झाली आहे. कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रामध्येही कोपरखैरणे व बोनकोडे या दोन गावांचाही समावेश होतो. बोनकोडे परिसरामध्येही फेरीवाले व वाहतूककोंडीची समस्या वाढली आहे.महापालिकेने कोपरखैरणेमध्ये माता-बाल रुग्णालय सुरू केले आहे; परंतु इमारत धोकादायक ठरल्यामुळे हे रुग्णालय काही वर्षांपासून बंद आहे. नवीन रुग्णालय बांधण्यासाठी स्थानिक नगरसेवक देविदास हांडे-पाटील यांनी वारंवार महापालिकेमध्ये पाठपुरावा केला आहे. प्रशासनास धारेवर धरले होते; परंतु अद्याप रुग्णालयाचा प्रश्न प्रशासनास सोडविता आला नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांना वाशीमधील प्रथम संदर्भ रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. तेथे जागा उपलब्ध होत नसल्यामुळे नाइलाजाने मुंबई किंवा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे. नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यास महापालिकेला अपयश आले आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई केली जात नसून हा प्रश्न गंभीर झाला आहे.मतांच्या राजकारणामुळे वाढली अतिक्रमणेकोपरखैरणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे; परंतु अनेक लोकप्रतिनिधींनी मतांच्या राजकारणासाठी याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळेच अतिक्रमणांचे प्रमाण वाढून नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. याचे गंभीर परिणाम पुढील काळात रहिवाशांना सहन करावे लागणार आहेत.सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्षकोपरखैरणे परिसराला विशेष राजकीय महत्त्व आहे. अनेक मोठ्या नेत्यांचे वास्तव्य या विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये आहे. पूर्वी राष्ट्रवादी व शिवसेनेचे या विभागामध्ये वर्चस्व होते. आता शिवसेना व भाजपमध्ये वर्चस्वाची स्पर्धा आहे; परंतु या परिसरातील अनधिकृत बांधकामे थांबवणे, वाहतूककोंडी, वाहनतळ, आरोग्य व फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्यात सर्वच राजकीय पक्षांना अपयश आले असून, येथील नागरिकांचा फक्त व्होट बँकेप्रमाणे उपयोग करण्यात येत आहे.कोपरखैरणेमधील प्रमुख समस्या पुढीलप्रमाणेसिडको विकसित नोडमध्ये अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढलेबैठ्या चाळींच्या जागेवर तीन ते पाच मजल्यांचे वाढीव बांधकामअतिक्रमणांमुळे पाणीपुरवठा व मलनि:सारण सुविधांवर ताणरस्ते अरुंद असल्यामुळे वाहतूककोंडीमध्ये वाढपार्किंगची समस्या गंभीर, मैदानांमध्येही वाहनांची पार्किंगरोड व मोकळ्या जागांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमणबोनकोडे परिसरामध्येही वाहतूककोंडी वाढलीमाता-बाल रुग्णालय बंद असल्याने रुग्णांची गैरसोयप्रशासनही हतबलकोपरखैरणेमधील अतिक्रमण व फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्याकडे महापालिका प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे.प्रशासनाचेही अप्रत्यक्ष अभय मिळत असल्यामुळे या दोन्ही समस्या गंभीर झाल्या असून, त्याचा फटका सामान्य कोपरखैरणेवासीयांना बसू लागला आहे.
कोपरखैरणे विभागाला समस्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:44 PM