उरण : चिरनेर-गव्हाणफाटा मार्गावर कंठवली येथे एका डंपरने सिडकोच्या हेटवणे पाण्याच्या पाइपलाइनच्या व्हॉल्व्हला धडक दिल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. बुधवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.भरधाव डंपरचे नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या हेटवणे पाइपलाइनवरील व्हॉल्व्हला धडक दिली. या धडकेमुळे हा व्हॉल्व्ह तुटल्याने जवळजवळ ६५ ते ७० मीटर उंच पाण्याचे फवारे उडत होते. हेटवणे धरणातून नवी मुंबईच्या सिडको हद्दीतील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ही पाइपलाइन टाकली आहे. सुमारे दीड मीटर व्यासाची ही पाइपलाइन आहे. या पाइपलाइनमधून मोठ्या दाबाने पाणीपुरवठा होत असतो. एका भरधाव डंपरने रस्त्याच्या कडेला असलेल्या एअर व्हॉल्व्हला धडक दिली. या धडकेमुळे या एअर व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होवून पाण्याचे पाटच्या पाट वाहत होते. बेलपाडा येथील आयुष ट्रान्सपोर्टचा हा डंपर होता. ही घटना समजल्यानंतर सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक ते दीड तासाने पाणीपुरवठा बंद केला व ताबडतोब पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.हेटवणे पाण्याची पाइपलाइन ही बहुतेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूने गेली असल्यामुळे वारंवार अशा प्रकारे अपघात होऊन पाण्याची गळती होण्याचे प्रकार घडतात. मागच्या महिन्यात २० मार्च रोजी अशाच प्रकारे कंटेनर ट्रेलरने धडक दिल्याने पाइपलाइन फुटली होती. गेल्यावर्षी दिघाटी खिंडीत अशाच प्रकारे डंपरने व कंटेनर ट्रेलरने व्हॉल्व्हला धडक दिल्यामुळे पाणी गळतीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत सिडकोचे कार्यकारी अभियंता संतोष ओबासे यांना विचारले असता बुधवारी पाइपलाइन फुटल्यामुळे जवळजवळ एक लाख लिटरपेक्षा जास्त पाणी वाया गेले. याबाबत आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
पाइपलाइनला डंपरची धडक
By admin | Published: April 20, 2017 3:41 AM