कामोठेत सिडकोच्या नावे घातले खड्ड्यांचे श्राद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:28 PM2019-09-15T23:28:11+5:302019-09-15T23:28:19+5:30
कामोठे वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण होऊन खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
कळंबोली : कामोठे वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण होऊन खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याचा कामोठेकरांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यात वाहने आदळून लहान-मोठे अपघातही घडले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही सिडकोकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत एकता सामाजिक संस्थेने नाराजी व्यक्त करत रविवारी सिडकोच्या नावाने रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करून श्राद्ध घातले.
हिंदू धर्मात पितृपक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण मानले जाते. शुक्रवारपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध घातले जाते. परंतु कामोठेत सिडकोच्या नावाने रविवारी साडेअकरा वाजता गुरुजींना बोलावून खड्ड्यांचे पूजन करून श्राद्ध घालण्यात आले. याचे कारण म्हणजे वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे. चालकांना आरोग्याच्या व्याधी उद्भवत असल्याचे संतोष चिखलकर या रहिवाशाने सांगितले. तक्रार केल्यावर अधिकारी येतात. पाहणी करतात आणि निघून जातात. लवकरच रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल असे उत्तर अधिकारी देतात. यासंदर्भात एकता सामाजिक संस्थेने सिडको अधिकाऱ्यांना जागे करण्याकरिता अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करून श्राद्ध घालण्यात आले. यावेळी एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे, अल्पेश माने, सुभाष सावंत, संतोष चिखलकर, गौरव जहागीरदार, उषा डुकरे, सुशांत सुवरे, सुनील करपे आदी उपस्थित होते.