नवी मुंबई : महापे शिळफाटा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी आणि रिक्षाचालक त्रस्त आहेत. खड्ड्यांमुळे उद्भवणाऱ्या दुखण्यांबरोबरच दररोजची कमाई रिक्षाच्या दुरुस्तीवरच खर्च करावी लागत असल्यामुळे, येथील त्रस्त रिक्षाचालकांनी स्वखर्चाने रविवारी रस्त्यांवरील खड्डे बुजविले, तसेच डोंगर माथ्यावरून थेट वाहतुकीच्या रस्त्यावर आलेली माती आणि दगड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.
ठाणे जिल्हा आॅटोरिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने महापे -शिळफाटादरम्यान रिक्षा वाहतूक करणाºया ५० रिक्षाचालकांनी एकत्रित येऊन हे काम केले. यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे या मार्गावर अनेक रस्त्यांना लहान-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मोठमोठ्या खड्ड्यांत वारंवार गाड्या आपटत असल्यामुळे नुकसान होत आहे. प्रवाशांना, वाहनचालकांना मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रार करूनही या खड्ड्यांकडे पाहण्यास संबंधित प्रशासनाला वेळ नसल्यामुळे, त्रस्त रिक्षाचालकांनी प्रत्येकी १०० रुपये जमा करत यातून खडी खरेदी केली. ही खडी खड्ड्यांत टाकून खड्डे बुजविण्यात आले. यावेळी रिक्षा चालक-मालक संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी, उपाध्यक्ष दिनेश भोईर, ठाणे जिल्हा विभाग अध्यक्ष विनोद वास्कर, रोशन भोईर, इब्राहीम शहा, इब्राहीम दळवी, नरेश कोळी, संदीप पवार नितीन भोईर, बाळाराम पाटील आदी उपस्थित होते.खड्ड्यांतून रिक्षा सतत आपटत असल्यामुळे प्रवाशांना आणि चालकांना त्रास होतोच. त्याबरोबरच गाडीचे नुकसान होते. कमावलेला पैसा या रिक्षाच्या दुरुस्तीसाठी खर्च करावा लागतो. दुरुस्तीसाठी रिक्षा गॅरेजमध्ये दिल्यानंतर दिवसभराच्या व्यवसायावर पाणी सोडावे लागत असल्यामुळेच हे खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला. आता तरी प्रशासनाने जागे होत, हे आणि शहरातील इतर खड्डे बुजवावेत.-विनोद वास्कर, जिल्हाध्यक्ष ठाणे जिल्हा आॅटोरिक्षा संघटना