पिझ्झा वाहनांची आरटीओकडे नोंद नाही

By admin | Published: May 9, 2016 03:29 AM2016-05-09T03:29:53+5:302016-05-09T03:29:53+5:30

पिझ्झा वाहनांची आरटीओकडे नोंद करणे आवश्यक असतानाही तसे होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आरटीओच्या लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी पसरत आहे

Pizza vehicles do not have an entry in the RTO | पिझ्झा वाहनांची आरटीओकडे नोंद नाही

पिझ्झा वाहनांची आरटीओकडे नोंद नाही

Next

नवी मुंबई : पिझ्झा वाहनांची आरटीओकडे नोंद करणे आवश्यक असतानाही तसे होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आरटीओच्या लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी पसरत आहे. शिवाय ही विनापरवाना वाहने रस्त्यालगत उभी असतानाही त्यावर कारवाईकडेही दुर्लक्ष होत आहे.
घरपोच पिझ्झा पोचवण्याची सुविधा देण्यासाठी विविध पिझ्झा सेंटरमध्ये मोटारसायकलींचा वापर केला जात आहे. त्याकरिता मोटारसायकलींच्या मूळ रचनेत बदल करून त्यावर पिझ्झा ठेवण्याची सोय केली जाते. यामुळे पिझ्झाच्या होम डिलेवरीसाठी वापरल्या जाणाऱ्या दुचाकींचा मालवाहू वाहनांमध्ये समावेश होतो. अशा व्यावसायिक वाहनांची आरटीओकडे नोंद करणे गरजेचे आहे. परंतु प्रादेशिक परिवहन विभागाचे निर्देश असतानाही पिझ्झा डिलेवरीच्या दुचाकींची नोंद केली जात नसल्याचे पाहायला मिळत आहे.
ही पिझ्झा वाहने रस्त्यालगत अथवा पदपथावर उभी केली जातात. यामुळे पादचाऱ्यांना अडथळा होत असून वाहतूककोंडीची देखील समस्या उद्भवते. शिवाय ग्राहकाला वेळेवर पिझ्झा पोचवण्याच्या प्रयत्नात चालकाकडून अनेकदा वाहतुकीचे नियम देखील धाब्यावर बसवले जातात. वाशी सेक्टर १७ येथे तर पिझ्झा वाहनांच्या पार्किंगसाठी सर्व्हिस रोडवरच अनधिकृत कब्जा केलेला आहे. तर कोपरखैरणे, नेरूळ परिसरात मुख्य रस्त्यालगतचे पदपथच पार्किंगसाठी वापरले जात आहेत. त्यानंतरही आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pizza vehicles do not have an entry in the RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.