विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : शासकीय योजना या मर्यादित न राहता त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत, असे प्रतिपादन शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी झिराड येथे बोलताना केले. झिराड ग्रामपंचायत आणि साई क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाठारे क्षात्रैक्य समाज सभागृहात आयोजित सत्कार सोहळा आणि दळी जमिनीच्या प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्र मात त्या बोलत होत्या. जेव्हा आपण शिखरावर जात असतो, तेव्हा आपल्या खालच्या बांधवांना साथ देणे आवश्यक असते. दहावी, बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे मार्गदर्शनही चित्रलेखा पाटील यांनी केले. शेकाप कायमच योग्य उमेदवारांना निवडून देते आणि असे उमेदवार सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, असे उद्गार जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप भोईर यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक करताना त्यांनी काढले. या वेळी व्यासपीठावर तहसीलदार प्रकाश संकपाळ, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकर म्हात्रे, दिलीप भोईर, पंचायत समिती सदस्या स्नेहा म्हात्रे, झिराडच्या सरपंच दर्शना भोईर, उपसरपंच अर्केश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी दहावी, बारावीत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शासनाच्या उपक्र मांची सविस्तर माहिती दिली. या वेळी आदिवासी बांधवांसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. दहावी, बारावीत उत्तीर्ण झालेल्या झिराड ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. साई क्र ीडा मंडळाच्या वतीने गेली १९ वर्षे पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षभराचे शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. यावर्षीही हा उपक्र म राबविण्यात आला. शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या २५ आदिवासी बांधवांना या वेळी दळी जमिनीच्या प्रमाणपत्राचे वाटप तहसीलदार प्रकाश संकपाळ आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. झिराड ग्रामपंचायतीच्या वतीने आणि जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांच्या विशेष प्रयत्नांतून या आदिवासी बांधवांना दळी जमिनीच्या प्रमाणपत्र वाटपाबाबत पाठपुरावा करण्यात आला, याला यश आल्याने आदिवासी बांधवांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
योजना तळागाळापर्यंत पोहचल्या पाहिजेत
By admin | Published: June 21, 2017 5:45 AM