नेरुळमधील नियोजित पक्षी अभयारण्य कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 12:10 AM2021-05-06T00:10:53+5:302021-05-06T00:11:47+5:30

सध्याच्या सरकारची उदासीनता : पर्यावरणप्रेमींनी केली मागणी

The planned bird sanctuary in Nerul is on paper | नेरुळमधील नियोजित पक्षी अभयारण्य कागदावरच

नेरुळमधील नियोजित पक्षी अभयारण्य कागदावरच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी मुंबई :   नेरूळ एनआरआय येथील पाणथळची जागा पक्षी अभयारण्य म्हणून विकसित करण्याची योजना  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार संबंधित विभागाला आदेश दिले होते; परंतु सध्याच्या सरकारच्या उदासीनतेमुळे  ही योजना कागदावरच राहिल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करून एनआरआयसह पांजे-फुंडे येथील पानथळच्या जागेवर पक्षी अभयारण्य विकसित करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

पांजे आणि एनआरआयच्या टी.एस. चाणक्यजवळील पाणथळवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी स्थलांतर करतात; परंतु या जागा नष्ट करून या ठिकाणी सिमेंटची जंगले विकसित करण्याचा घाट सिडकोने घातला आहे. सिडकोच्या या प्रयत्नाला पर्यावरणप्रेमी संस्था मागील अनेक वर्षांपासून विरोध करीत आहेत. या दोन्ही जागांवर पक्षी अभयारण्य विकसित करावे, यासाठी या संस्थांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. डिसेंबर २0१५ मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  राज्य वन्यजीव मंडळाची दहावी बैठक झाली होती. या बैठकीत फडणवीस यांनी मुंबई प्रदेशात तीन ठिकाणी पक्षी अभयारण्य उभारण्यास मंजुरी दिली होती. यात माहुल शिवडी, नवी मुंबईतील पामबीचलगत टीएस चाणक्यचा परिसर आणि उरण येथील  पांजे-फुंडे या जागांचा समावेश होता. त्यामुळे फ्लेमिंगोंचे संवर्धन करणे शक्य होईल, असा विश्वास फडणवीस यांनी त्यावेळी व्यक्त केला होता; परंतु सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने या निर्णयाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप नेटकनेक्ट फाउंडेशचे संचालक बी.एन. कुमार यांनी केला आहे.  सध्या पांजे येथील नियोजित पक्षी अभयारण्याच्या स्थळाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी राजरोसपणे मातीचा भराव टाकला जात आहे. खाडीच्या पाण्याचा प्रवाह रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याविरोधात पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी राज्य सरकारकडे तक्रारी केल्या आहेत, तर काही संस्थांनी थेट न्यायालयात धाव घेतली.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने दिला होता पाठिंबा 

पाणजे आणि टीएससी-एनआरआय या ठिकाणी पक्षी अभयारण्य उभारण्याबाबत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे.  संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी एका विस्तृत जागेत जैवविविधता प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव बीएनएसएसचे संचालक डॉ. बिशाव पांडाव यांनी सादर केल्याची माहिती बी.एन. कुमार यांनी दिली आहे. 

दरम्यान,  पांजे पाणथळचे काँक्रीटच्या जंगलात, तर टीएससी-एनआरआय पाणथळचे गोल्फ कोर्समध्ये रूपांतर करण्याची संबधितांची योजना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही योजना मोडीत काढून दोन्ही ठिकाणी पक्षी अभयारण्य विकसित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी केली आहे.

Web Title: The planned bird sanctuary in Nerul is on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.