पार्किंग आराखड्यासाठी नियोजनबद्ध आखणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:51 PM2019-08-23T23:51:03+5:302019-08-23T23:52:45+5:30
स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबईत पार्किंगची मोठी समस्या भेडसावत आहे.
नवी मुंबई : शहरातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, त्याकरिता पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी पालिका अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलिसांची बैठक घेऊन शहरातील पार्किंगच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी नियोजनबद्ध आखणीद्वारे शहरात स्मार्ट सर्वसमावेशक पार्किंग धोरण तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबईत पार्किंगची मोठी समस्या भेडसावत आहे. रहिवासी इमारती उभारल्या जाताना वाहन पार्किंगकडे दुर्लक्ष होत आहे, तर वाणिज्य संकुल, मॉल या ठिकाणीही नियोजनाकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांवर वाहने उभी केली जात आहेत. परिणामी, सतत रहदारी असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा अवैध वाहनतळ तयार झाले आहेत. यामुळे वाहतूककोंडीसह छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत, तर सिडको विकसित नोड व गावठाणांभोवती असलेली खेळाची मैदानेही वाहन पार्किंगने व्यापली आहेत. अशातच शहरवासीयांकडून वाहन खरेदीवरही भर दिला जात असल्याने भविष्यात पार्किंगची समस्या अधिक वाढणार आहे. याची दखल घेत पालिकेने पुढील १५ वर्षांच्या पार्किंगच्या नियोजनासाठी हालचाली सुरू केल्या. त्याकरिता शुक्रवारी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली.
सदर बैठकीला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी, अमोल यादव, वाहतूक पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, नगररचनाकार सतीश उगिले, उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आदी उपस्थित होते. वाहतूक व्यवस्था नियोजनबद्ध करण्यासाठी वाहनतळांसाठी जागेची उपलब्धता हा महत्त्वाचा घटक आहे. त्या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा तयार करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्याच्याही सूचना आयुक्तांनी दिल्या. सध्या पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागा आणि भविष्यातली गरज याबाबत सूचना केल्या.