नियोजनाने अभ्यासाचा ताण आला नाही; जेईई मुख्य परीक्षेतील टॉपर अथर्व तांबट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 01:33 AM2021-03-27T01:33:33+5:302021-03-27T01:33:57+5:30
अभ्यासाला खऱ्या अर्थाने सुरुवात अकरावीपासून झाली. क्लासेसमधून मिळणाऱ्या नोट्सचा अभ्यास केला तसेच परीक्षेच्या अगोदर एनसीआरटीमधून अभ्यास केला.
नवी मुंबई : अभ्यास करताना त्याचे व्यवस्थित नियोजन केले होते. त्यामुळे अभ्यासाचा मनावर कधीच तणाव आला नाही, असे अथर्व तांबट याने सांगितले. जेईई मुख्य परीक्षेत अथर्वने १०० पर्सेंटाइल गुण प्राप्त केले असून, तोे वाशी येथील रहिवासी आहे.
जेईई मुख्य परीक्षेचा मार्चचा अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत देशातील तब्बल १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यार्थी असून, अथर्व हा नवी मुंबईतील विद्यार्थी आहे. अथर्वचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट मेरी आयसीएसई स्कूल, कोपरखैरणे येथे झाले आहे, तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल येथे झाले आहे. अथर्वची आई गृहिणी असून, अथर्वचे वडील खासगी नोकरी करतात. परीक्षेचा अभ्यास अथर्वने दहावीपासूनच मोकळ्या वेळेत सुरू केला होता.
अभ्यासाला खऱ्या अर्थाने सुरुवात अकरावीपासून झाली. क्लासेसमधून मिळणाऱ्या नोट्सचा अभ्यास केला तसेच परीक्षेच्या अगोदर एनसीआरटीमधून अभ्यास केला. येतोय असं वाटल्यावर घरी टेबल टेनिस खेळून किंवा गाणी ऐकणे अशा माध्यमातून काही वेळ विरंगुळा करून तणाव घालविल्याचे अथर्वने सांगितले. यापुढे जेईई ॲडव्हान्ससाठी तयारी करत असून, आयआयटी मुंबईमध्ये कॉम्पुटर विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे ध्येय अथर्वने निश्चित केले असल्याचे सांगितले. मुलाच्या यशामुळे अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया आईवडिलांनी दिली असून, नवी मुंबईतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अनेक विद्यार्थी दहावीला चांगले मार्क मिळवतात. परंतु अकरावीला अभ्यास वाढतो त्यामुळे तणावात येतात. अभ्यासाचे योग्य नियोजन करून आपल्या ध्येयाच्या दृष्टीने सातत्य ठेवण्याचा सल्ला अथर्वने जेईई मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.