नवी मुंबई : विश्वात्मके देवे मंडळी या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने खारघर येथील पांडवकडा टेकडीवर रविवारी वृक्षरोपण करण्यात आले. या उपक्रमाला मराठवाडा मित्र परिवार आणि खारघर फोरम या संस्थेचे सहकार्य लाभले होते. संयुक्त सहकार्यातून पार पडलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमाला विविध जिल्ह्यातील सुमारे ३०० वृक्षप्रेमींनी हजेरी लावली होती. या प्रसंगी जवळपास २५० वृक्षांची लागवड करण्यात आली.
विश्वात्मके देवे मंडळी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून वृक्षरोपण कार्यक्रम केला जात आहे. या संस्थेने आतापर्यंत पांडवकड्यावर दोन हजार झाडांची लागवड करून त्यांना यशस्वीरीत्या जगवले आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबई व पनवेल परिसरात राहणारे संस्थेचे सदस्य वर्षभर या ठिकाणी येऊन या झाडांना पाणी देऊन त्यांची निगा राखतात. अशाप्रकारे मागील वर्षभर जवळपास दोन हजार झाडांची येथे लागवड करण्यात आली आहे. यावर्षी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मराठवाडा मित्र परिवार या संस्थेने हिरिहिरीने भाग घेतला. या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य सहकुटुंब सहभागी झाले होते. लहान मुलांनी वृक्षरोपणाचा आनंद लुटला. पाणी फाउंडेशन, नाम फाउंडेशन या संस्थांनी सुरू केलेल्या कार्याच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून वृक्षारोपण ही चळवळ सुरू करण्याचा मनोदय या वेळी उपस्थित वृक्षप्रेमी सदस्यांनी व्यक्त केला.