रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मलगत झाडाची फांदी पडली, थोडक्यात बचावले प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 03:09 PM2019-06-20T15:09:03+5:302019-06-20T15:09:33+5:30
प्रवाशी थोडक्यात बचावले
अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी - डहाणू रोड रेल्वे स्थानकाच्या पहिल्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर पार्सल कार्यालयानजीक असलेल्या जांभळाच्या झाडाचा फांदा पडल्याने, प्रवाशी थोडक्यात बचावले. दरम्यान त्यानंतर खाली पडलेल्या जांभळाची चव चाखण्याकरिता एकच धावपळ उडाली. मात्र स्थानकानाजीकच्या झाडांची नियमित छाटणी आवश्यक असून अन्यथा नाहक बळी जाण्याची भीती आहे.
गुरुवार, 20 जून रोजी सकाळी दहापन्नासच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी काही मिनिटं आधीच चार क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर विरारच्या दिशेने लोकल येऊन थांबली होती. प्रवाशी स्थानकाच्या पश्चिम दिशेने बाहेर पडत असताना हा अपघात घडला. येथे असलेल्या पन्नास ते साठ फूट उंच जांभळाच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळं लागली असून त्या वजनाने हा फांदा कोसळला. त्यामुळे झाडाखालून जाणारे दहा ते पंधरा प्रवासी थोडक्यात बचावले. दरम्यान जमिनीवर टपोरी जांभळं पडलेली पाहून प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि पोलीस यांनी फळांची चव चाखण्याकरिता गर्दी केली. मात्र काही वेळातच तुटून पडलेला फांदा तत्काळ हटवून, जागेची स्वच्छता करण्यात आली.
दरम्यान रेल्वे स्थानकानजीक असणारी झाडं उन्हाळ्यात सावली देत असल्याने, त्याखाली आश्रयाला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढते. शिवाय ही हिरवळ पर्यावरण आणि स्थानकाची शोभा वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावतात. मात्र त्यांची नियमित छाटणी करण्याची आवश्यकता आहे.