नवी मुंबई : पर्यावरणाचा वाढता ऱ्हास थांबवून शहरातील पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे काम डी.वाय. पाटील समूहाच्या वतीने केले जात आहे. मंगळवारी नेरूळमधील एल.पी.जंक्शन ते उरण फाटा दरम्यानच्या हायवेशेजारील जमिनीचे सुशोभीकरण व वृक्षलागवड करण्यात आली. या उपक्रमामध्ये ५५०हून अधिक वृक्षांची लागवड करण्यासाठी संस्थेच्या विविध समूहातील ५००हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. डी. वाय. पाटील रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या परिसरातील जमिनीचे सपाटीकरण, खड्डे बुजविणे, उच्च दर्जाची माती अंथरणे अशा प्रक्रियेसाठी डी. वाय. पाटील समूहाच्या वतीने लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या उपक्रमातंर्गत नेरूळ एल.पी.जंक्शन हायवेलगतच्या पट्ट्यावरील बऱ्याच भागामध्ये हिरवा गालिचा अंथरण्यात आला आहे. वृक्षलागवडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक चांगले योगदान देण्याकरिता हा उपक्रम राबविल्याची माहिती या संस्थेच्या वतीने देण्यात आली. या हरित उपक्रमांतर्गत झाकरंडा, चाफा, पिसोनिया, रेन ट्री, गुलमोहर, पेल्टोफरम, नीम, कदंब, बेल या जातींच्या झाडांचा समावेश आहे. या संपूर्ण परिसरात लॉन तयार करण्यात आले आहे. डी.वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण संवर्धन काळाची गरज, असे संदेश देऊन पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती केली. दीड ते दोन किलोमीटरच्या या संपूर्ण रस्त्यावर हिरवा पट्टा तयार करून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ही वृक्ष लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड सोहळ््याला डी.वाय. पाटील समूहाच्या विविध संस्थेतील प्राचार्य, विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)या उपक्रमांतर्गत संस्थेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने खारीचा वाटा उचलण्यात आला आहे. यामध्ये लागवड केलेल्या सर्वच वृक्षांची विशेष देखभाल घेतली जाणार आहे. या उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे विशेष कौतुक आहे.- डॉ. विजय पाटील, संस्थाध्यक्ष
हरित उपक्रमांतर्गत ५५० झाडांची लागवड
By admin | Published: August 26, 2015 12:28 AM