कोविडच्या उपचार पद्धतीत प्लाझ्माचा समावेश नको
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 01:03 AM2021-05-03T01:03:38+5:302021-05-03T01:03:59+5:30
टास्क फोर्स : पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा वेबसंवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : जागतिक स्तरावर कोरोना रुग्णांवरील उपचार पद्धतीत प्लाझ्मा पद्धतीला फारसे स्थान नाही. त्यामुळे कोविडच्या उपचारात प्लाझ्माचा समावेश केला जाऊ नये. किंबहुना संबंधित डॉक्टरांनी या पद्धतीच्या उपचार प्रणालीची शिफारससुद्धा करू नये, असे मत महापालिकेने स्थापन केलेल्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. तसेच रेमडेसिविरच्या वापाराबाबत सुद्धा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, लक्षणामधील होणारे बदल, त्यानुसार उपचार पद्धतीचा अवलंब आदींबाबत विचारविनिमय करण्याच्या दृष्टीने महापालिकेने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फार्समध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. या टास्क फोर्सची विशेष रविवारी घेण्यात आली. ऑनलाइन झालेल्या या बैठकीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तज्ज्ञ डॉक्टरांशी वेबसंवादाद्वारे विविध मुद्यांवर विस्तृत चर्चा केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या अधिक आहे. विशेषत: यात ५0 वर्षांवरील ८0 टक्के रुग्णांचा समावेश आहे.
रुग्णाची ऑक्सिजन पातळी झपाट्याने खालवत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर ५0 वर्षांवरील कोरोनाबाधिताला गृहविलगीकरणात न ठेवता त्यांना कोरोना उपचार केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी यावेळी दिली. त्याअनुषंगाने त्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधला. तसेच यावेळी रेमडेसिविर इंजेक्शनचा सुयोग्य वापर, उपचार पद्धतीत स्टिरॉइडची उपयुक्तता, सध्याची ऑक्सिजन कमतरता, प्लाझ्माबाबतचा अनुभव आदी विषयांवर सुद्धा यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्लाझ्मा उपचार पद्धती उपयुक्त ठरत असल्याचे जागतिक स्तरावर कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे या उपचार पद्धतीची शिफारस केली जाऊ नये, असे यावेळी टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी सूचित केले. सर्व रुग्णालयांनी राज्य कृती दलाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच रेमडेसिविरचा वापर करणे अनिवार्य आहे. शिवाय कोणत्याही रुग्णालयाने रेमडेसिविरची औषध आणण्यासाठी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांना चिठ्ठी देऊ नये. ही कृती कायद्याने प्रतिबंधित असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे मत सर्व सदस्यांनी व्यक्त केले. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची अधिकाधिक उपलब्धता व्हावी, यादृष्टीने सुद्धा सर्वंकष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले.
यांनी घेतला संवादात सहभाग
या बैठकीला पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह नायर हॉस्पिटलचे मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश राजाध्यक्ष, किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटलचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. गजानन वेल्हाळ, कार्डिओलॉ़जिस्ट डॉ. उदय जाधव, बालरोगतज्ज्ञ डॉ. उपेंद्र किजवडेकर, इन्टेसिव्हिस्ट डॉ. अक्षय छल्लानी, अॅनेस्थेटिस्ट डॉ. जेसी एलिझाबेथ, फिजिशिअन डॉ. अजय कुकरेजा आदी तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते. तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ़. धनवंती घाडगे यांनीही या वेबसंवादमध्ये भाग घेतला होता.