वास्तुविहारमध्ये प्लॅस्टर कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 11:41 PM2018-12-05T23:41:27+5:302018-12-05T23:41:34+5:30
खारघर शहरात सिडकोने उभारलेल्या वास्तुविहार गृहप्रकल्पातील बिल्डिंग क्रमांक १२ मधील तिसऱ्या माळ्यावरील जिन्यातील प्लॅस्टर कोसळल्याची घटना नुकतीच घडली.
पनवेल : खारघर शहरात सिडकोने उभारलेल्या वास्तुविहार गृहप्रकल्पातील बिल्डिंग क्रमांक १२ मधील तिसऱ्या माळ्यावरील जिन्यातील प्लॅस्टर कोसळल्याची घटना नुकतीच घडली. दुपारी १.३०च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसले, तरी या गृहप्रकल्पातील निकृष्ट काम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
सिडकोने येथे जवळपास दोन हजार घरे उभारली आहेत. २००९ मध्ये रहिवाशांना या घरांचा ताबा देण्यात आला आहे. अवघ्या दहा वर्षांच्या आतच येथील रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकप्रकारे आमची फसवणूक झाल्याचा आरोप येथील रहिवाशांनी सिडको प्रशासनावर केला आहे. सिडकोने नुकत्याच विविध नोडनिहाय घरांच्या सोडती जाहीर केल्या. या गृहप्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, नऊ वर्षांपूर्वी सिडकोने उभारलेल्या वास्तुविहार प्रकल्पाची दुरवस्था पाहता भविष्यात उभारल्या जाणाºया गृहप्रकल्पाची निर्मिती योग्य पद्धतीने व टिकाऊ दर्जाची असणे गरजेचे आहे. खारघर सेक्टर-१५ मधील घरकूलसह वास्तुविहार या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात समस्यांना येथील रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी भिंतींना तडे गेलेले आहेत, पाण्याच्या टाक्यांना गळती लागली आहे, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्या या ठिकाणी उद्भवत आहेत. प्लॅस्टर कोसळून रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणाºया घटनादेखील या ठिकाणी अनेक वेळा घडल्या असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका संजना समीर कदम यांनी केला आहे. मागील दोन वर्षांपासून या ठिकाणच्या समस्या वारंवार सिडकोच्या निदर्शनास आणूनदेखील सिडको प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.
सिडको व गृहप्रकल्पाचे ठेकेदार यांच्यातील या प्रकल्पाच्या उभारणीच्या कराराची मागणी आम्ही वेळोवेळी सिडको प्रशासनाकडे करीत आहोत. मात्र, सिडको प्रशासन आम्हाला या कराराची माहिती देत नाही. लवकरच याकरिता माहितीच्या अधिकारात मागणी मागविणार असल्याचे वास्तुविहार केएच-२ हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष समीर कदम यांनी सांगितले.